भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा |District Info

District Info

 • District Info

  जिल्‍हा - गोंदिया

   

  1.1 प्रस्‍तावना -

              गोंदिया जिल्‍हा दिनांक 1 मे, 1999 रोजी भंडारा जिल्‍हयाचे विभाजन करून निर्माण करण्‍यात आला. जिल्‍हयात 8 तालुक्‍यांचा समावेश असुन त्‍यांची नावे गोंदिया, आमगाव, गोरेगाव, सालेकसा, देवरी, सडक/अर्जुनी, अर्जुनी/मोरगाव व तिरोडा आहेत. 1 जानेवारी, 2001 पासुन गोंदिया जिल्‍हयाकरिता वरिष्‍ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यालयाची स्‍थापना करण्‍यात आली.

  1.2 भौगोलीक स्‍थान

                         गोंदिया जिल्‍हा महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या र्इशान्‍य कोप-यात वैनगंगा नदीच्‍या खो-यात वसलेला असुन जिल्‍हयाचे एकुण क्षेत्रफळ 5641.00 चौ.किमी. आहे. जिल्‍हयाच्‍या उत्‍तरेस मध्‍यप्रदेश व पुर्व सिमेला छत्तिसगड राज्‍याच्‍या सिमा लागुन आहेत. तसेच पश्चिमेस भंडारा जिल्‍हा व दक्षिणेस गडचिरोली जिल्‍हयाच्‍या सिमा लागुन आहेत. जिल्‍हयाचा समावेश भारतीय सर्वेक्षण विभागाच्‍या डिग्री शीटस  क्र. 55/ओ, 55/पी, 64/सी व 64/डी मध्‍ये असुन विस्‍तार उत्‍तर अक्षांश 200 40' पासुन 210 40' तर रेखांश 790 48' पासुन 800 42' पर्यंत आहे.

  1.3 प्रशासकिय रचना

                           जिल्‍हयात 4 महसुली उपविभाग असुन त्‍यात 8 तालुक्‍यांचा समावेश आहे व सर्व तालुक्‍याचे ठिकाणी पंचायत समिती मुख्‍यालये आहेत.

  अ.क्र.

  जिल्‍हा

  महसुल उपविभाग

  समाविष्‍ट तालुके

  1

  गोंदिया

  गोंदिया

  गोंदिया,आमगाव

  2

  देवरी

  देवरी,सालेकसा

  3

  तिरोडा

  तिरोडा,गोरेगाव

  4

  अर्जुनी/मोरगाव

  अर्जुनी/मोरगाव, सडक/अर्जुनी

   

   

  1.4 हवामान व पर्जन्‍यमान

                            जिल्‍हयाचे हवामान विषम स्‍वरूपाचे आहे. उन्‍हाळयात कमाल तापमान 430 सेल्‍शीयस तर हिवाळयात किमान तापमान 100 सेल्‍शीयस असते. जुन ते सप्‍टेंबर या कालावधीत नैऋत्‍य मौसमी वा-यामुळे पाऊस पडतो. जिल्‍हयाचे सरासरी पर्जन्‍यमान 1349 मि.मी. आहे. वायव्‍य भागात 1255.80 मि.मी. तर जास्‍तीत जास्‍त 1459.50 मि.मी. पर्जन्‍य जिल्‍हयाच्‍या आग्‍नेय भागात पडतो.

  1.5 प्राकृतिक रचना

                            जिल्‍हयाचा उत्‍तर पश्चिम भू-भाग कमी उताराचा असुन पुर्व व दक्षिण भू-भाग मध्‍यम उताराचा आहे. जिल्‍हयाच्‍या दक्षिण भागात प्रतापगड व आग्‍नेय भागात मांडवगड या प्रमुख टेकडया आहेत. जिल्‍हयाचे 2 स्‍वाभाविक विभाग खालील प्रमाणे आहेत.

  1. उत्‍तर पुर्व व दक्षिण पुर्वेकडील डोंगराळ भाग

  2. उत्‍तर व पश्चिमेकडील वैनगंगा  चुलबंद नदीचा सपाट प्रदेश

                            जिल्‍हयातील एकुण 1276 चौ.किमी. क्षेत्र जंगलव्‍याप्‍त असुन त्‍याची टक्‍केवारी एकुण क्षेत्राच्‍या 26 टक्‍के आहे. 

                           जिल्‍हयात वैनगंगा ही मुख्‍य नदी असुन ही गोदावरी खो-यातील एक प्रमुख नदी आहे. वैनगंगा नदीच्‍या बाघ, चुलबंद व गाढवी हया उपनद्या आहेत. बाघ नदी ही तिच्‍या उगमस्‍थानापासुन जिल्‍हयाच्‍या ईशान्‍य कडे उत्‍तर वाहिनी असुन नंतर मध्‍यप्रदेशाचे सिमेवरुन पश्चिम वाहिनी झालेली आहे. इतर दोन उपनद्या दक्षिण पश्चिमेकडे वाहणा-या आहेत. जिल्‍हयात मुलतः समानांतर व उप-समानांतर प्रकाराची ड्रेनेज सिस्‍टीम दिसुन येते. जिल्‍हयाचा भौगोलीक क्षेत्राचा सुदुर तंत्राद्वारे अभ्‍यास करण्‍यात आला असुन त्‍या आधारे लिनीयामेंट दर्शविणारा नकाशा तयार करण्‍यात आलेला असुन त्‍याचा उपयोग विहिर, विंधण विहिरीचे स्‍थळ निश्चितीकरणासाठी करण्‍यात येतो.

  1.6 मृदा

                           गोंदिया जिल्‍हयातील मृदा ही सामान्‍यतः पिवळसर रंगाची,मध्‍यम प्रतीची रेती मिश्रीत व पाणी धरून ठेवणारी आहे. सदर मृदा भात पिकासाठी योग्‍य असल्‍यामुळे जिल्‍हयात मोठया प्रमाणात भाताची लागवड केली जाते. या व्‍यतिरिक्‍त नदी नाल्‍याच्‍या काठावरील गाळाची व सुपीक जमीनीमध्‍ये भाजीपाला लागवड घेतली जाते.

                           येथील मृदा मुख्‍यतः अग्‍नीजन्‍य व रुपांतरीत  खडकाचे विघटना पासुन तयार झालेली आहे व प्रामुख्‍याने रेसीडयुअल प्रकारची आहे.

   

   

  1.7 भू ‘ शास्‍त्रीय रचना

                           जिल्‍हयातील क्षेत्र अतिप्राचीन अग्‍नीजन्‍य व रुपांतरीत खडकांनी व्‍याप्‍त असुन यात प्रामुख्‍याने ग्रॅनाइट, निस, शिष्‍ट, फिलाइट, अॅन्‍डेसाइट, रायोलाइट, अॅम्‍फीबोलाइट, क्‍वार्टझाइट व सॅन्‍डस्‍टोन इत्‍यादी खडकांचा समावेश होतो. भू-शास्‍त्रीय   वर्गीकरणानुसार जिल्‍हयातील खडकांचे वयोमानानुसार वर्गीकरण खालील प्रमाणे करता येते.

  अ.क्र.

  वयोमान

  भू-स्‍तर

  समाविष्‍ट खडक

  रिसेंट व प्लिस्‍टोसीन

  मृदा,लॅटेराइट,अॅल्‍यु‍व्‍हीयम

  मृदा, लॅटेराइट, अॅल्‍यु‍व्‍हीयम र्इत्‍यादी

  प्रिकँब्रीयन

  डोंगरगड सुपरगृप

  अॅन्‍डेसाइट, ग्रॅनाइट, रायोलाइट, सॅन्‍डस्‍टोन इत्‍यादी

  आर्कियन

  साकोली गृप

  अॅम्‍फीबोलाइट, निस, शिष्‍ट, ग्रॅनाइट,  फिलाइट,  क्‍वार्टझाइट

   

  1) साकोली गृप

                            या गटातील खडकांमध्‍ये क्षेत्रातील  अतिप्राचीन खडकांचा समावेश होतो. यात अॅम्‍फीबोलाइट, ग्रॅनाइट, ग्रॅनाइटनिस, मायकेशियस शिष्‍ट, क्‍वार्टझाइट, फिलाइट, हेमॅटीटीक व ब्रेसीएटेड क्‍वार्टझाइट  इत्‍यादी खडकांचा समावेश होतो. साकोली गृप खडकांमध्‍ये लोहाचे प्रमाण जास्‍त असुन ते जिल्‍हयाच्‍या पश्चिम भागात आढळतात. सदर खडक अत्‍यंत प्राचिन असल्‍याने व भूगर्भिय हालचालीमुळे खडकांमध्‍ये फोल्‍डस्, फॉल्‍टस्, जॉईंट, इंटु्जंन्‍स इत्‍यादी मोठया प्रमाणावर दिसून येतात. तसेच भूपृष्‍ठीय हालचालीमुळे या खडकांची झीज मोठया प्रमाणावर झाल्‍याने विघटीत खडकांची जाडी 25 ते 30 मीटर पर्यंत आढळते.

  2) डोंगरगड सुपर गृप

                             यात प्रामुख्‍याने ग्रॅनाइट, अॅन्‍डेसाइट, रायोलाइट व सॅन्‍डस्‍टोन इत्‍यादी खडकांचा समावेश असुन, ते जिल्‍हयाच्‍या पुर्व भागात आढळतात, साकोली गृप पेक्षा या गटाच्‍या खडकात भूगर्भिय हालचालीचे प्रमाण कमी असल्‍यामुळे फोल्‍डस्, फॉल्‍टस्, जॉईंट, इंटु्जंन्‍स इत्‍यादी संरचना कमी प्रमाणात आढळते. तसेच भूपृष्‍ठीय हालचालीमुळे होणारी झीज सुद्धा कमी प्रमाणात आढळते. त्‍यामुळे विघटीत खडकाच्‍या स्‍तराची जाडी 10 ते 20 मी. पर्यंत आढळते.

   

   

  3) लॅटेराइट, मृदा, अॅल्‍यु‍व्‍हीयम

                              प्रिकँब्रीयन वयोमानानंतर जिल्‍हयाच्‍या भूभागावर नविन खडक निर्माण झालेले नाहीत. दरम्‍यान भूपृष्‍ठीय हालचालीमुळे खडकाची झीज व विघटनाची प्रक्रीया मोठया प्रमाणात झालेल्‍या आढळतात. परिणामी लॅटेराइट (मुरूम) हा खडक जिल्‍हयात सर्वत्र प्रमुख खडकाच्‍या आवरणाच्‍या स्‍वरूपात तयार झालेला दिसुन येतो व याची जाडी 1 ते 3 मीटर पर्यंत आढळते.

                              मृदा ही खडकाच्‍या विघटनातुन  तयार होते. या जिल्‍हयात खडकाची झीज मोठया प्रमाणावर झालेली असल्‍यामुळे मातीच्‍या थराची जाडी साधारणता 1 ते 3 मीटर आढळते.

                               मोठया नद्या, नाल्‍याच्‍या काठावर अॅल्‍युव्‍हीयम जिल्‍हयात बहुतेक ठिकाणी आढळते. वैनगंगा नदीकाठ परिसरात अॅल्‍युव्‍हीयमची जाडी 20 ते 25 मी. पर्यंत आढळते. यात वाळुचे प्रमाण अधिक असल्‍यामुळे भूजलाच्‍या दृष्‍टीने अॅल्‍युव्‍हीयमचे विशेष महत्‍व आहे. अॅल्‍युव्‍हीयमच्‍या तुलनेत जिल्‍हयात लॅटेराइटचे प्रमाण अधिक आहे. लॅटेराइट खडकाचे भूजलाच्‍या दृष्‍टीने या जिल्‍हयात फारसे महत्‍व नाही.

  4) जलधारक भूस्‍तराची वैशिष्‍टे

                               जिल्‍हयातील प्रमुख जलधारक खडक अत्‍यंत कठिण प्रकारचा असल्‍याने त्‍याची सच्‍छीद्रता व जलवहन क्षमता मुळातच अत्‍यंत कमी आहे. परंतु या क्षेत्रात मोठया प्रमाणावर झालेल्‍या भूगर्भिय व भूपृष्‍ठीय हालचालीमुळे खडकांचे विघटन होऊन त्‍यात दुय्यम जलवहन व जलधारण क्षमता काही भागात वाढलेली आढळते. परंतु अशी क्षेत्रे जिल्‍हयात कमी प्रमाणात आढळुन येतात. साधारणता विशिष्‍ट जलधारण क्षमता 1 टक्‍के पेक्षा कमी आढळते.

                               प्रामुख्‍याने विघटीत खडकामध्‍ये चिकन माती चे प्रमाण अधिक असल्‍यामुळे तसेच अशा खडकाची जाडी सुद्धा जास्‍त (18 ते 30 मी. ) आढळुन येत असल्‍यामुळे एकंदरीत खडकांची भूजल वहन क्षमता कमी आहे. त्‍यामुळे जिल्‍हयातील सिंचन विहिरींची क्षमता देखील अत्‍यल्‍प आहे. त्‍यामुळे जिल्‍हयात सिंचन विहिरींचे प्रमाण कमी आहे.

                               उपरोक्‍त वैशिष्‍टपुर्ण परिस्थितीमुळे जिल्‍हयात सिंचनासाठी नुसत्‍या विहिरी घेण्‍यापेक्षा सिंचन विहिरींचे तळाशी 30 मी. ते 45 मी. खोलीचे ईनवेल बोअर घेतल्‍यास सिंचन क्षमतेत बरीच वाढ होऊ शकते. मात्र या करीता सिंचन विहिरीची खोली 12 मी. ते 15 मी. व व्‍यास 4 ते 6 मीटर असावा.

   

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा | संपर्क

मानवजातीच्या अस्तित्वासाठी पाणी महत्वाची भूमिका बजावते. पिण्यासाठी, सिंचन आणि औद्योगिक वापरासाठी पाण्याची मागणी वेगाने वाढत आहे. वाढती मागणी देखील लोकसंख्या वाढीशी संबंधित आहे.