भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा |District Info

District Info

 • District Info

  जिल्हा - चंद्रपूर

  प्रस्तावना :

              भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, ही शासनाच्या धोरणानुरूप जिल्ह्यातील भूजलाचा शास्त्रशुद्ध अभ्यास, भूजल सर्वेक्षण, संशोधन, व्यवस्थापन, आणि भूजल संपत्तीचे मुल्यांकन नियोजन इत्यादी विविध योजना राबविणारी अग्रगण्य यंत्रणा आहे.

              साधारणपणे 21 व्या शतकाच्या सुरूवातीपासून (माहे जून-2001 नंतर) भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या कामकाजाच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणत बदल घडून आला. त्यानुसार ही यंत्रणा प्रामुख्याने भूजलाचे अस्तित्व असलेले स्त्रोत संरक्षीत करून जलसंवर्धनाच्या उपाययोजनांची सुयोग्य भूजल व्यवस्थापनांची कामे करीत आहे.

              शासनाच्या विविध योजनेअंतर्गत या यंत्रणेमार्फत भूजल मूल्यांकन, निरीक्षण विहीरीतील पाणी पातळी मोजमाप, गाव स्तरावर विस्तृत सखोल भूजल सर्वेक्षण, इंस्टीट्‌यूशनल योजनांतर्गत स्थानिक भूजल सर्वेक्षण, भू-भौतिक सर्वेक्षण, शिवकालीन पाणी साठवण योजनांतर्गत सर्वेक्षण, वाळू घाट सर्वेक्षण प्रकरणे, विंधन विहीरींचे जलभंजन इत्यादी अंतर्गत भूजल सर्वेक्षण, भूजल अधिनियमाची अंमलबजावणीबाबत योग्य कार्यवाही करणे, तसेच निरीक्षण विहीरी पर्जन्यमान यांचा तुलनात्मक अभ्यास करून संभाव्य पाणी टंचाई अहवाल मा. जिल्हाधिकारी यांना सादर करणे, जलविज्ञान प्रकल्पांतर्गत पिझोमिटर्स मधील पाण्याच्या पातळीच्या नोंदी घेणे आवश्यकतेनुसार संगणकातून हायड्रोग्राफ्‌स तयार करणे माहितीचे विश्लेषण करणे इत्यादी कामे प्रभावीपणे यंत्रणेमार्फत केली जात आहेत. पाणी पुरवठा स्वच्छता विभाग, शासन निर्णय क्र.आपना-105/प्र.क्र.242/पापु-15, दि. 24 फेब्रुवारी, 2006 अन्वये भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेला प्रकल्प कार्यान्वयन यंत्रणा म्हणून घोषित करण्यात आले.

   

  जिल्ह्याची ठळक वैशिष्टये :

   

              आज चंद्रपूर नावाने प्रचलीत असलेला हा जिल्हा पूर्वी 'लोकापूर' हया नावाने प्रसिद्ध होता. ह्याचेच नामांतर इंद्रपूर आणि त्यानंतर चंद्रपूर असे झाले. मध्यंतरी ब्रिटीश राजवटीत ह्याचे नाव "चांदा" असे करण्यात आले. 1964 मध्ये मात्र पून्हा चांदा हे नाव बदलून आजचे प्रचलीत नाव चंद्रपूर करण्यात आले.

              चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्राच्या दक्षिण-पूर्व कोपऱ्यात पसरलेला असून खनिज संपत्तीने वनसंपत्तीने सर्वात समृद्ध, मनमोहक वनश्रीनंे नटलेला असा विदर्भातील, महाराष्ट्र-आंध्रप्रदेश ह्यांच्या सिमेवर वसलेला जिल्हा आहे. ह्या जिल्हयाचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ 11,443 चौ.कि.मी. असून 780 46' ते 800 0' पूर्व अक्षांक्ष 190 30' ते 200 45' उत्तर रेखांशामध्ये सामावलेला आहे.

              जिल्ह्याच्या पूर्व सीमेवर उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी वैनगंगा तसेच पश्चिम सीमेवरुन वाहणारी वर्धा नदी या जिल्ह्याच्या पूर्व पश्चिम सीमा निर्धारीत करतात. संपूर्ण क्षेत्र हे गोदावरीच्या खोऱ्यात समाविष्ट असून पैनगंगा, इरई ह्या इतर प्रमूख नद्या आहेत. जिल्हयातील सर्व नद्या उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहतात. एक दुसऱ्यास उत्तर-दक्षिण समांतर अशी पाणलोट क्षेत्राच्या साखळीने जिल्ह्याची भूरचना आहे. जिल्ह्यातील पहाडक्षेत्र वगळता सपाटभागातील समूद्रसपाटीपासून सर्वसाधारण महत्तम उंची उत्तर भागात 274.30 मी. असून दक्षिणेकडील सपाट लघूत्तम उंची 123.75 मी. इतकी आहे. उत्तरेकडून-दक्षिणेकडे सर्वसाधारण उतार आहे.

  प्रशासकीय दृष्ट्या जिल्ह्याची खालीलप्रमाणे 15 तालुक्यात विभागणी करण्यात आलेली आहे.

  1. चंद्रपूर, 2. मूल, 3. सावली, 4. गोंडपिपरी,           5. वरोरा,  6. भद्रावती, 7. चिमूर, 8. ब्रम्हपूरी, 9. नागभीड, 10. सिंदेवाही,  11. राजुरा, 12. कोरपना 13. पोंभूर्णा, 14. बल्लारपूर, 15. जिवती.

  चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 1791 गावांपैकी वस्ती असलेली एकूण 1442 ओसाड अशी 349 गावे आहेत.   2001 च्या जनगणनेनूसार जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 20.71 लाख इतकी असून त्यापैकी 10.63 लाख म्हणजेच 51 टक्के पूरूष 10.08 लाख म्हणजे 49 टक्के स्त्रिया आहेत. एकूण लोकसंख्येत स्त्री-पूरूषांचे प्रमाण जवळ जवळ बरोबरीचे आहे.

             

  हवामान :-

              चंद्रपूर जिल्ह्याचे साधारण हवामान विषम आहे. उन्हाळा अतिशय कडक असून उन्हाळ्यातील तापमान 40 ते 48 से. दरम्यान असते.  हिवाळ्यातील तापमान 6 ते 14 से. दरम्यान असते. नैऋत्य मोसमी वारे ह्या प्रदेशावर पर्जन्याची बरसात करतात. जिल्ह्याचे पर्जन्यमान वार्षिक सरासरी 1142.07 मि.मि. एवढे आहे.

  विद्यूतीकरण :         

  मार्च - 2016 पावेतो जिल्ह्यातील 1580 गावांचे 14 शहरांचे विद्यूतीकरणाचे काम पूर्ण झालेले आहे. जिल्ह्यामध्ये आतापावेतो 28000 कृषीपंपांना वीजपूरवठा करण्यात आलेला आहे.

   

  वनक्षेत्र वनसंपत्ती :

              चंद्रपूर जिल्हा वनश्रीने नटलेला असून जिल्ह्यातील वनक्षेत्र 4065 चौ. कि. मी. म्हणजेच एकूण क्षेत्राच्या 38 टक्के इतके आहे. वनोत्पादनात सागवन, तेंदूपत्ता, बांबू, इमारती जळावू लाकूड इत्यादींचा महत्वपूर्ण सहभाग आहे.

  भौगोलिक भूशास्त्रीय रचना :-

  चंद्रपूर जिल्ह्याची भौगोलिक रचना महाराष्ट्रात एकमेव द्वितीय प्रकारची आहे.  जिल्ह्यातील उत्तरेकडील भाग हा काहीसा रुंद दक्षिणेकडील भाग काहीसा निमूळता आहे.

  उत्तरेकडील उंच भागाला चिमूर - पारसागड - नागभीड - राजोली - वामनपल्ली टेकड्या म्हणतात. दक्षिणेकडील राजुरा तालुक्याच्या दक्षिण आणि पश्चिम भागाला माणिकगढ टेकड्या किंवा चांदूरगड नावाचा डोंगर आहे. मुल आणि चिमूर या दोन टेकड्यांच्या रांगांमूळे वर्धा आणि वैनगंगा नद्यांच्या पाणलोट क्षेत्राची विभागणी झालेली आहे.  या टेकड्यांची समूद्रसपाटीपासून सर्वसाधारण उंची 300 मिटस एवढी आहे.

              माणिकगढ डोंगर हा बेसॉल्ट ह्या लाव्हाजन्य खडकांपासून बनलेला असून पैनगंगा आणि वर्धा ह्या नद्यांच्या दक्षिणेकडील भागात राजुरा तालुक्याच्या दक्षिण आणि पश्चिम भागात वसलेला आहे.

              भूशास्त्रीय भाषेत ह्याला "मेसा" म्हणतात. हा प्राकृतीक पठाराचा, समांतर लाव्हारसाने बनलेल्या बेसॉल्ट दगडाचा भूभाग असून याची समूद्रसपाटीपासून उंची 600 मीटस इतकी आहे आणि पैनगंगा वर्धा नदीच्या संयुक्त खोऱ्यापासून उंचीवर उचलल्यासारखा टेकडीचा प्रदेश आहे.

  चंद्रपूर जिल्हा हा विविध प्रकारच्या भूस्तरांचा बनलेला आहे.

              भूस्तर रचनेनूसार आणि त्याच्या प्रत्यक्ष निर्मितीच्या क्रमानुसार चंद्रपूर जिल्ह्याचा भूस्तर खालीलप्रमाणे आहे.

  वर्ष

  भूस्तराचा प्रकार

  टक्केवारी

  आढळणारा भूस्तर तालूका

  नवीनतम

  वाळूचा गाळाचा प्रदेश

  5%

  भद्रावती, चिमूर,

  खालचा इओसिन ते वरचा क्रिटेशियस

  डेक्कन बेसॉल्ट

  10%

  वरोरा,  राजूरा, आणि काही भाग

  खालचा क्रिटेशियस ते ज्यूरॅसीक

  लॅमेटा

   

  30%

  वरोरा, भद्रावती आणि काही भाग

  वरचा परमियन ते कार्बाेनिफेरस

  गोंडवाना

  वरोरा, भद्रावती, चिमूर, राजूरा, गोंडपिपरी,

  केंब्रीयनपूर्व

  विंध्यन वाळूचा भूस्तर

  20%

  राजूरा, चिमूर, भद्रावती, सिंदेवाही, नागभिड, ब्रम्हपूरी

  आर्कीयन्स

  विघटीत, स्फटीकीय विकेंद्रीत भूस्तर

  35%

  भद्रावती, वरोरा, चिमूर, ब्रम्हपूरी, नागभिड, सिंदेवाही, मूल गोंडपिंपरी,

   

              विविध प्रकारच्या भूस्तरांचे वर्णन खालील प्रमाणे आहे.

  1.    आर्कियन्स :

       आर्कियन सर्वात पूरातन असे रूपांतरीत खडक असून स्फटिकीय शिस्ट विभागणी करण्याजोगे नसलेले भूस्तराने व्यापलेले आहेत. ह्यांवर 'धारवार' समूहाचे रूपांतरीत जलजन्य खडक विसावलेले आहे आणि ग्रॅनाईट सारख्या खडकांनी त्यांना आरपार छेदलेले आहे.

   

  जलजन्य धारवार समूहाच्या प्रस्तरांची

  1.     सौसंर ग्रुप

  2.     साकोली ग्रुप आणि

  3.     लोह खनिज सिरीज

  अशी विभागणी करण्यात आलेली आहे.

              चंद्रपूर जिल्ह्यातील लोह खनिज तिस-या प्रकारात मोडतात. क्वॉर्टझाईट्स, रेघाटी हेमेटाईट, शिस्ट फिलाईट्स इत्यादी प्रस्तरांमध्ये लोह आढळून येते.

  2.    विंध्यन प्रस्तर :

              जिल्ह्यातील भूभाग हा चूनखडीच्या दगडाने, जांभळया शेल आणि वाळूच्या दगडाने व्यापलेला आहे. वरोरा, ब्रम्हपूरी आणि राजुरा तालुक्यात हा भूस्तर प्रामुख्याने आढळतो. म्हणूनच माणिकगढ आणि अल्ट्राटेक समूहाच्या सिमेंट उत्पादनाचे प्रकल्प ह्‌या भागांतच आहेत.

  3.    गोंडवाना प्रस्तर :

  पुरातन खडक आर्कियन्स केंब्रियन पूर्व ह्यांनी गोंडवाना प्रकारच्या भुस्तराला जमण्यासाठी जणूकाही उथळ खोल पार्श्वभूमी तयार केली. 

  अ. खालचा गोंडवाना :

   हिमनग कालावधीत जमा झालेल्या या प्रकारच्या भूस्तर समूहात क्वॉर्टझाईट्स, वाळूचा खडक, ग्रिट, काँग्लोमरेट्स इ. प्रकारच्या भूस्तरांचा समावेश आहे.  ह्यांंना 'मांगली बेड्स' म्हणतात आणि हे वरोरा तालुक्यात आहे.

  ब. लॅमेटा बेड्स :

  हे बेसॉल्टच्या तळाशी आणि गोंडवाना ह्‌यांच्यामध्ये आढळणारे भूस्तर असून, ह्यात वालूकामय दगड, चुनखडीयूक्त, चुनखडीचा दगड आणि हिरवट रंगाच्या मातीचा समावेश आहे. बेसॉल्ट आणि गोंडवाना ह्यांच्या क्षेत्रामध्ये हा लॅमेटा झोन, तसेच वरोरा तहसीलीच्या कोळसा परिसरात ह्या प्रकारच्या भूस्तराची मुबलकता आढळते.

   

   

  4.    दख्खनचे पठार किंवा बेसॉल्ट :

  जिल्ह्‌याचा लहानसा भूभाग या लाव्हारसयुक्त बेसॉल्टने व्यापलेला आढळतो. मिसोझोईक कालावधीतील म्हणजे सुमारे 60 ते 70 मिलीयन वर्षापूर्वी महाराष्ट्रात लाव्हारस हा भूभागावर समांतर रेषांसारखा पसरला. याची जाडी अंदाजे 40 मि. पर्यंत वरोरा तहसीलीमध्ये बोथली गावाजवळ आढळते.

  खनिज संपत्ती :

  चंद्रपूर हा महाराष्ट्रातील खनिजसंपत्तीने समृद्ध असा जिल्हा आहे.

  अ. कोळसा :

  कोळशाचे भूगर्भीय विपुल साठे हे  चंद्रपूर जिल्ह्याचे वैशिष्ठ्‌य आहे.

  1.      वर्धा खोऱ्यातील कोळशाचे साठे गोंडवाना समूहाच्या 'दामूदा' सिरीजमधील बाराकार प्रस्तर प्रकारात मोडतात.

  2.      चंद्रपूर क्षेत्रातील साठे हे चंद्रपूर शहरालगतच आहेत.

  3.      घुग्घुस परीक्षेत्रातील कोळशाचे साठे दोन भागात आढळतात. एक म्हणजे घुग्घुसच्या उत्तरेकडील भाग आणि दुसरा म्हणजे घुग्घुसच्या दक्षिणेकडे पैनगंगा नदीपर्यंतचा प्रदेश.

  4.      बल्लारपूर परीक्षेत्र हे चांदा परिक्षेत्राच्या दक्षिणेकडील भागात आढळते.

  5.      राजुरा-सास्ती हे परीक्षेत्र वर्धा नदीच्या दक्षिण-पश्चिम किनाऱ्यावर आढळते.

  6.      वरोरा परिक्षेत्रातील कोळशाचे साठे हे वर्धा खोऱ्याच्या कोळशाच्या साठ्‌याच्या उत्तरेकडील भागात आढळतात.

  7.      माजरी क्षेत्रात कोळशाचे प्रचंड प्रमाणात साठे आहेत.

  ब. लोह :

  कोळशाच्या खालोखाल लोह खनिज चंद्रपूर जिल्ह्यात विपूल प्रमाणात आढळते.  ब्रम्हपूरी आणि वरोरा तालुक्यात लोहखनिज, प्रामूख्याने सापडते. हॅमेटाईट हे लोहाचे ऑक्साईड मुख्यत्वेकरुन चंद्रपूर जिल्ह्यात सापडते. चंद्रपूर जिल्ह्यातील काही ठळक लोहखनिज साठे गुंजेवाही, लोहारा, पिंपळगांव, भिसी येथे आढळतात.

  क. चूनखडीचा दगड :

  मुख्यत्वेकरून वरोरा तालुक्यातील कोंढाळा, पुरकेपार, कळमगव्हाण, मेंढा आणि निलजई या गावांमध्ये तसेच राजुरा तालुक्यात चुनखडीचा दगड मोठया प्रमाणात आढळतो. जिल्ह्यातील ACC, माणिकगढ, अंबुजा आणि अल्ट्राटेक सिमेंट कारखाने याच परिसरात आहेत.

  ड. तांबे :

  तांबेचे खनिज ठानेवासना, चिकमारा, बोथली, मोटेगाव दुबारपेठ येथे आढळतात.

  इ. बॅराईट :

  बेरीयम सल्फेटचे साठे थोड्याफार प्रमाणात फुटाणा, नळेश्वर, महादवाडी, जानाळा पोंभूर्णा येथे आढळतात.

  फ. फलोराईड :

  हा खनिज वरोरा तालुक्यातील डोंगरगाव कोरपना तालुक्यातील धोपटाळा येथे आढळलेला आहे.

  जमीन तिचे प्रकार :

  चंद्रपूर जिल्ह्यात जमीनीचे विविध प्रकार आढळून येतात. 7 प्रकारच्या जमिनी स्थानिक प्रचलित भाषेनूसार खालील नावानी प्रसिद्ध आहेत.

  1.       काळी :- बेसॉल्टच्या विघटनामूळे तयार होणारी ही जमीन काळ्‌या रंगांची असून वर्धा आणि वैनगंगा नदीच्या खो-यात आढळते.

  2.       कामहार :- ही काळी जमीनीपेक्षा कमी सुपिक आणि जलधारक क्षमता कमी असलेली जमीन नदीलगत किंवा तलावांच्या तळाशी आढळते.

  3.       मोरांड :- ही चंद्रपूर जिल्ह्यात सर्वात जास्त प्रमाणात आढळते. ही हलक्या रंगाची वाळूमिश्रीत लोसी जमीन असून ओलिताच्या दृष्टीने चांगली गणली जाते.

  4.       खर्डी :- ही खडकाळ प्रकारची हलक्या रंगाची जमीन आहे. ही धानाच्या बांध्यामध्ये मुख्यत्वेकरून आढळते. यामध्ये वाळू आणि मातीचे मिश्रण अशाप्रकारे असते की, उन्हाळयात उष्णतेने ही तडकत नाही.

  5.       रेताडी आणि बरडी :- ही ओलिताच्या दृष्टीने अतिशय निरूपयोगी जमीन आहे.  एकतर ही रेतीची असते किंवा बारीक खड्‌यांची असते.

  भूजल विषयक माहिती :

              भूजलधारक प्रस्तरांची सच्छिद्रता, वाहक क्षमता आणि उतार हे तीन भूजलाची उपलब्धता आणि त्याची वहनता यासाठी आवश्यक घटक आहेत.

              स्फटीकीय रुपांतरीत प्रस्तर हे मुलत: सच्छिद्रताधारक नसतात. परंतू त्यांच्यातील विघटीतपणा, जोडणता आणि भेगा, तुटकता यामूळे यांच्यात जलधारक क्षमता काही प्रमाणात निर्माण होते. भेदकतेचे प्रमाण, जोडणीतील सांधा आणि विघटीतपणाच्या प्रमाणावर त्यांची जलधारक क्षमता अवलंबून असते आणि ही क्षमता प्रस्तरांमध्ये विविध जागी विविध प्रकारची आढळून येते.

              भूजलांचे वहन हे त्यांच्या आढळून येणा-या स्थितीवर अवलंबून असते. Water Table conditions म्हणजे स्थिर पातळी रेषा आणि दाबाखाली आढळणारे भूजल.

              पहिल्या प्रकारच्या भूजलाची पातळी उथळ असते, आणि हया भूजलाचा उपसा विहीरीद्वारे केला जातो. दुस-या प्रकारच्या भूजलांचा उपसा हा सहसा विंधनविहीरी, कूपनलिका ह्यांद्वारे केला जातो. या प्रकारचे जलधारक प्रस्तर जास्त खोलीवर आढळतात. अशा प्रकारचे जलधारक प्रस्तर हे वहनक्षमता कमी असलेल्या प्रस्तरांमध्ये आढळतात. चंद्रपूर जिल्ह्यात विविध प्रकारचे भूजल धारक प्रस्तर विविध प्रकारच्या प्रस्तरांमध्ये आढळत असल्याने त्यांचा परामर्श स्वतंत्ररित्या घेण्यात येत आहे.

  1.       आर्कियन्स :

  पुरातन आर्कियन्स रूपांतरीत खडक चंद्रपूर जिल्हयात बहूतांश ठिकाणी उदा. मुल, नागभिड, चिमूर, ब्रम्हपूरी, सिंदेवाही, तालुक्यात आढळतात. हे धारवार, सौसंर, साकोली आणि दक्षिण पेनीनसूला समूहातील ग्रॅनाईट आणि नाईसेस या प्रकारचे  प्रस्तर आहेत. त्यांच्या रचनेत आंतरीक बदलाव जडणघडण इत्यादीत विविधता आढळते. या प्रस्तरांमध्ये मुलत: सच्छिद्रता नाही परंतू सच्छिद्रता विपूल ते साधारण आहे. विघटीत थराची जाडी कमी अधिक असते.  ह्या विघटीत थराच्या खाली भेगा असलेला विघटीत खडक आढळतो. विभागीय प्राकृतीक रचनेवर प्रस्तरांची रचना आणि विघटीतपणा अवलंबून असते.

  आर्कियन भूस्तर प्रस्तरांमध्ये जोड आणि भेगा असलेल्या विघटीत प्रस्तरात भूजलाची उपलब्धता आढळते. प्रस्तरामध्ये या जोड भेगा एकमेकांशी आतून जोडलेल्या असल्यास उपलब्धता विपूल आढळते. असे भूजलधारक विभाग साधारणत: 27 ते 40 मी. खोलीपर्यंत आढळून आलेले आहेत.

  2.       केंब्रियनपूर्व :

  विंध्यन चुनखडी आणि शेल हे भूप्रस्तर या विभागात मोडतात.  भूजलाची उपलब्धता यांतील विघटीत जाडीत आढळते पण ही फारच कमी असते.  चुनखडी प्रकारात जर द्रावणाला हालचालीला जागा असेल तर भूजलाची उपलब्धता चांगली आढळते.

  3.       विंध्यन शेल आणि चुनखडी :

  राजुराच्या उत्तर-पश्चिम भागात कोरपना तालुक्यात हे प्रस्तर आढळतात. यांत अत्यल्प भूजल उपलब्धता आढळते. या भागात विहीरींची खोली 6 ते 19 मी. असून विहीरंीची ंक्षमता 27 कि.ली./दिन हिवाळयात उन्हाळयात 10 ते 12 कि.ली./दिन एवढी आहे.

  4.       गोंडवाना :

   गोंडवाना जलजन्य खडक हे राजुरा, वरोरा, चंद्रपूर, ब्रम्हपूरी या तालूक्यात आढळतात. वाळूचा दगड, शेल आणि विविध जाडी आणि पकडीची माती हे यातील मुख्य घटक आहेत. कधीकधी पेबल्स आणि ग्रॅवेल हे सूद्धा कमी अधिक प्रमाणात आढळतात.

  भूजलाची उपलब्धता ही दाबाच्या किंवा अर्धदाबाच्या (confined and semiconfined) प्रस्तरांच्या स्थितीत असते. यांमध्ये भूजलाची विपूलता आढळते.  प्रस्तरांची सच्छिद्रता आणि सवहनता चांगली असते. भूशास्त्रात आढळणा-या प्रस्तरांच्या रचनेनूसार गोंडवाना प्रकारच्या भूस्तरांचे खालील प्रकार आहेत.

  अ. कामठी आणि बाराकार वाळूचे दगड :

              हे चंद्रपूरच्या दक्षिणपूर्व आणि दक्षिण पश्चिम भागात आढळतात. या परिसरात भूजलाचा विकास हा कूपनलिकांद्वारे होवू शकतो. या भागातील सिंचन विहीरींची खोली 6 ते 10 मी. असून सरासरी व्यास 4 मी. इतका आहे.  हिवाळ्‌यात विहिरींची क्षमता 139 किलोलिटर्स प्रतिदिन तर उन्हाळयातील क्षमता 81 किलो लिटर्स प्रतिदिन एवढी आहे.  पाण्याच्या स्थिर पातळीत  फक्त 1 ते 3 मी. एवढा फरक पडतो.

              ग्रामीण पाणी पुरवठा योजने अंतर्गत या प्रकारच्या वाळूच्या दगडामध्ये 216 यशस्वी कूपनलिका घेण्यात आल्या आहेत.  त्यापैकी 160 कूपनलिका या 10 किलोलिटर्स प्रतितास पेक्षा जास्त क्षमतेच्या आहेत. यातील ब-याच कूपनलिकांवर विद्यूतपंप बसवून ग्रामीण पाणी पुरवठा करण्यात येत आहे. गोंडवाना वाळूच्या खडकाने व्याप्त भागात केंद्रीय भूजल मंडळाने प्रायोगिक तत्वावर कूपनलिका घेतलेल्या असून त्यांच्या परीक्षेनूसार या खडकाची

                          1. साठवणूक क्षमता                    :           8.6  x 103

                                  2. वहन क्षमता                             :           2396.26 वर्ग मिटर/दिन

                          3. विशेष क्षमता                          :           471.81 लि / मि/मिटर

                                                      ड्राडाउन इतकी दर्शविली आहे.

  या भागात साध्या विहीरी इनवेल बोअर्सद्वारा सिंचनाकरीता पाण्याचाउपसा केला जातो. परंतू हे उपस्याचे प्रमाण उपलब्धतेच्या अत्यल्प आहे. म्हणून दोन कूपनलिकांमध्ये कमीत कमी 1000 मिटर्सचे अंतर ठेवून 300 नवीन कूपनलिका सिंचनाकरीता या भागांत घेता येउू शकतील त्याद्वारे 1500 हेक्टर्स पर्यंत क्षेत्र बारामाही ओलीताखाली आणता येईल.

   

   

  ब.  तालचिर :

              चंद्रपूरचा उत्तर-पश्चिम आणि उत्तर-पूर्व भाग आणि राजुराच्या उत्तरेकडील थोड्‌याशा भागात तालचिर शेल आढळतो.  हा अत्यंत कमी साठवणूक क्षमता आणि कमी वाहकक्षमता असलेला प्रकार असल्याने यात भूजल उपलब्धता अतिशय कमी प्रमाणात आढळते. या प्रस्तरांतील विहीरीची खोली 8 ते 12 मी. असून क्षमता फक्त 36000 ते 45000 लिटर्स/दिन एवढी आहे. पाण्याच्या वापस (Recuperation) येण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.

   

  5.       दख्खनचे पठार :

              लाव्हारसयुक्त बेसॉल्टने चंद्रपूर जिल्ह्‌याचा फक्त 3% भाग व्यापलेला आहे. वरोराच्या उत्तर-पश्चिमेला राजुराच्या दक्षिणेला हा प्रस्तर आढळतो. यात मुलत: सच्छिद्रता नसतेच परंतू दुय्यम सच्छिद्रता कधी-कधी विपूल प्रमाणात भूजलाची साठवणूक करते.  वरोरा तालुक्यात काही भागात दाबनियमन भूजलधारक प्रस्तंरात भूजल आढळून आले आहे.

              विहीरीची खोली 6 ते 11 मिटर्स असून क्षमता हिवाळ्‌यात 36 ते 90 किलोलिटर्स/दिन तर उन्हाळयात 18 ते 66 किलोलिटर्स एवढी आढळते. म्हणजेच भूजलाची उपलब्धता या प्रस्तरात सर्वसाधारण आहे.

  6.  गाळाचा प्रदेश :

              वरोरा, ब्रम्हपूरी हा वर्धा आणि वैनगंगा नदी लगतचा प्रदेश सुपिक गाळाचा जलजन्य प्रदेश म्हणून ओळखल्या जातो. साध्या सिंचन विहीरी फक्त ब्रम्हपूरी तालुक्याच्या गाळाच्या प्रदेशात आढळतात. वरोरा तालुक्यात हे प्रमाण अल्प आहे. जलधारक प्रस्तर वाळू, पेबल आणि ग्रॅवेल हे आहेत. यंाची खोली साधारण 20 ते 30 मिटर्स इतकी असते.

              वैनगंगा आणि वर्धा नदी लगतच्या या गाळाच्या प्रदेशात उथळ कूपनलिका सिंचनाकरीता यशस्वी होतील, असे उपलब्ध अनुमानावरून वाटते.

              वालूकामय गाळाच्या प्रस्तराची ब्रम्हपूरी आणि वरोरा तालुक्यातील क्षमता 40 किलोलिटर्स/दिन ते 1935 कि.ली./दिन एवढी विपूल आहे.

             

  चंद्रपूर जिल्हयाची ठळक वैशिष्टे

  1.    चंद्रपूर जिल्हयातील प्रमूख धरणे

  1)         आसोला मेंढा                  -           मध्यम प्रकल्प                              सिंदेवाही

  2)         घोडाझरी                        -           मध्यम प्रकल्प                              सिंदेवाही

  3)         नलेश्वर                         -           मध्यम प्रकल्प                              सिंदेवाही

  4)         चारगाव                         -           मध्यम प्रकल्प                              वरोरा

  5)         चंदई                              -           मध्यम प्रकल्प                              वरोरा

  6)         अमलनाला                     -           मध्यम प्रकल्प                              कोरपना

  7)         लभानसराड                    -           मध्यम प्रकल्प                              वरोरा

  8)         पकडी गुड्डम                    -           मध्यम प्रकल्प                              कोरपना

  2.    चंद्रपूर जिल्हयातील खनिज संपत्ती क्षेत्रफळ

   

  1)         कोळसा                                      -                                   490.22 वर्ग कि.मी.

  2)         लोखंड                                       -                                   0.062 वर्ग कि.मी.

  3)         सिमंेट चुनखडी                         -                                   166.75 वर्ग कि.मी.

  4)         बॅराईटस                         -                                   0.15 वर्ग कि.मी.

  5)         तांबे                                           -                                   0.035 वर्ग कि.मी.

  6)         क्रोमाईट                         -                                   0.05 वर्ग कि.मी.

  7)         फलोराईडस                                -                                   0.065 वर्ग कि.मी.

  3.    चंद्रपूर जिल्हयातील प्रमूख नदया

   

  नदया                                   तालूका

   

  1)         वर्धा नदी                                    --          वरोरा, चंद्रपूर, राजूरा गोंडपिपरी

  2)         इरई नदी                                    --          चंद्रपूर, भद्रावती

  3)         अंधारी नदी                    --          मूल

  4)         वैनगंगा नदी                    --          ब्रम्हपूरी, सावली, गोंडपिपरी,

  5)         पैनगंगा नदी                    --          कोरपना - राजूरा

  6)         उमा नदी                                    --          मूल, चिमूर

   

  4.    चंद्रपूर जिल्हयातील पर्यटन स्थळे

   

  पर्यटन स्थळ                                    तालूका

  1.         ताडोबा                                      --                     भद्रावती

  2.         आनंदवन                                   --                      वरोरा

  3.         अंधारी व्याघ्र प्रकल्प                    --                      चंद्रप्‌ूर, चिमूर, भद्रावती, सिंदेवाही

  4.         रामाळा तलाव                             --                      चंद्रपूर

  5.         घोडाझरी प्रकल्प                          --                      सिंदेवाही

  6.         सात बहिणी तपोवन                     --                      सिंदेवाही

  7.         जुनोना                                       --                      चंद्रपूर

  8.         अडयाळ टेकडी                           --                      नागभिड

  5.    चंद्रपूर  जिल्हयातील तीर्थक्षेत्रे

   

  1.         महाकाली मंदिर                           --                                  चंद्रपूर

  2.         वढा                                           --                                  चंद्रपूर

  3.         पार्श्वनाथ मंदिर                           --                                  भद्रावती

  4.         सोमनाथ                                     --                                  मूल

  5.         रामदेगी                                      --                                  चिमूर

  6.         बालाजी मंदीर                             --                                  चिमूर

   

  प्रयोगशाळा :

   

               पाणी पुरवठा स्वच्छता विभाग / सुधारणा सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापन कक्ष, सिडको भवन (दक्षिण कक्ष) 1 ला मजला सी.बी.डी.,बेलापूर, नवी मुंबई. महाराष्ट्र शासन यांचे पत्र क्र. 237/10 दिनांक 15/10/2011 मा. संचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे यांचे पत्र क्र.5752/11 दिनांक-15/10/2011 नुसार प्राप्त मार्गदर्शक सुचनाचे अनुषंगाने दिनांक 1/11/2011 रोजी प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली.

           तसेच पाणी पुरवठा स्वच्छता विभाग मंञालय मुबंई यांचे शासन निर्णय क्र डब्लुक्युएम.2014/प्र.क्र-08/पापु-12, दि. 18 डिसेबर, 2014 नुसार सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सनियंञाणाखाली असलेल्या जिल्हा पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा उपविभागीय प्रयोगशाळा वरोरा, गोडपिपरी, सावली, भद्रावती, सिदेवाही ब्रम्हपूरी तसेच प्रयोगशाळेत कार्यरत असलेले नमुष्यबळ साहित्य दि.01/04/2015 पासुन या कार्यालयाकडे हस्तांरित करण्यात आलेले आहे. या प्रयोगशाळेकरिता 8 रसायनी, 7 प्रयोगशाळा सहाय्यक, 6 अनुजैविक तज्ञ 1 डाटा एन्टी ऑपरेटर, प्रयोगशाळा परिचर 6 असे एकूण 28 कंञाटी पध्दतीने कर्मचारी कामे करत आहे. प्रयोगशाळेतून जलस्ञोत नमुन्यातील संबंधित घटकांचे रासायनिक जैविक पृ:थकरण करण्यात येते. सन 2016-2017 या वर्षात एकुण 19634 नमुने रासायनिक पृ:थकरण 13497 नमुने •Öîʴɍú पृथकरण असे एकूण 33131 चे पृथक्करण करण्यात आलेले आहे. त्यापैकी एकुण 7783 नमुने बाधीत असल्याचे आढळुन आलेले आहे. तपासणी केलेल्या नमुन्याची ऑनलाईन डाटा एन्ट्री पूर्ण करण्यात आलेली आहे.

  भूजल माहीती उपभोक्ता गट (HDUG) -

              भूजल माहीती उपभोक्ता गटाअंतर्गत खाजगी संस्थांना भ्‌ूजल विषयक माहिती मागणीनुसार पुरविण्यात आली. सदस्यत्व शुल्क (5 वर्षाकरिता) आधारसामुग्री दरानुसार सुरूवातीपासून रू. 98510/- प्राप्त झाले आहेत.

              वरील सर्व योजनांकरिता सर्वेक्षण करित असताना प्रचंड प्रमाणावर तांत्रिक माहिती एकत्रित होत असते. सदर माहितीचे संकलन विश्लेषन करून त्यामधून भरीव तांत्रिक उद्बोधन होण्याच्या दृष्टीने जिल्ह्याचा तांत्रिक अहवाल तयार करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा | संपर्क

मानवजातीच्या अस्तित्वासाठी पाणी महत्वाची भूमिका बजावते. पिण्यासाठी, सिंचन आणि औद्योगिक वापरासाठी पाण्याची मागणी वेगाने वाढत आहे. वाढती मागणी देखील लोकसंख्या वाढीशी संबंधित आहे.