भूभौतिक सर्वेक्षण
महाराष्ट्र राज्याच्या भूस्तरातील खडकांची रचना वैविध्यपुर्ण असल्याने जमिनीखालील भूजलाच्या उपलब्धतेचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या शास्त्रीय पध्दती उपलब्ध आहेत. प्रामुख्याने प्रचलित भूभौतिक सर्वेक्षण पध्दतीत खडकांच्या भौतिक गुणधर्मांचा अभ्यास विद्युत चुंबकिय उपकरणाव्दारे करुन, त्या अभ्यासाव्दारे जमिनीखाली असलेल्या भूजलाच्या उपलब्धतेचा अंदाज काढण्यात येतो.
खडकांच्या विविध गुणधर्मा पैकी विद्युत रोधकता हा एक गुणधर्म आहे. विद्युत रोधकता मोजण्यासाठी रेझीस्टीव्हीटी मीटर या विद्युत चुंबकीय उपकरणाचा वापर केला जातो.
यंत्रणेच्या स्थापनेपासुन भूभौतिक सर्वेक्षणाचा उपयोग जलधर निर्धारण प्रकल्पामध्ये ( जलधर निर्धारण पथदर्शी प्रकल्प (AQMP), हेतु आधारीत प्रकल्प (PDS), महाराष्ट्र जलक्षेत्र सुधार प्रकल्प (MWSIP), राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम सपोर्ट ऍक्टिव्हीटी (NRDWP), जलस्वराज्य प्रकल्प (JS II) ) प्रामुख्याने करण्यात आला.
नळ पाणी पुरवठा योजनांसाठी स्त्रोतांचा शोध घेणे व कृत्रीमरित्या भूजल पुर्नभरणाच्या उपाययोजनांसाठी या तंत्राचा वापर करण्यात येतो.
अपारंपारीक उपाय योजनांतर्गत जमिनीखाली असलेल्या भेगा बंद करणेसाठी राबविण्याची उपाययोजना (FSC) आणि भेगा नसलेल्या जागांजवळ कमी खोलीच्या विंधन विहीरी घेवून बोअर ब्लास्ट (BBT), स्ट्रीम ब्लास्टिंग पध्दतीव्दारे नविन भेगा व फटी निर्मिती करणे यासाठी सर्वेक्षण.
शेतकरी/वैयक्तिक/संस्थाना पिण्याचे पाणी तसेच सिंचनासाठी आवश्यक असलेल्या विंधन विहीरी/साधी विहीर यांच्या स्थळ निश्चितीसाठी तांत्रिक सल्ला दिला जातो.
भूभौतिक सर्वेक्षणाची उपकरणे व तंत्र –
भूभौतिक सर्वेक्षण पध्दत भूजलाचा शोध योग्यरित्या अचुकपणे घेवुन तद्व्दारे स्त्रोतांची शाश्वतता साध्य करण्यासाठी अंत्यत उपयोगी आहे. तसेच या शास्त्राचा वापर भूजल विकासापासून व्यवस्थापनापर्यंत करता येईल. यासाठी प्रामुख्याने खालील उपकरणांचा वापर भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमध्ये करण्यात येतो.
रेझीस्टिव्हीटी मीटर
या उपकरणाचा उपयोग विद्युत रोधकता कमी जास्त असलेल्या भूस्तरांची माहिती काढण्यासाठी होतो. सर्वेक्षणासाठी चार लोखंडी खुंट्याव्दारे जमिनीखाली विद्युत प्रवाह सोडून विद्युत रोधकता मोजली जाते.या पध्दतीव्दारे वेग वेगळ्या स्तरांची विद्युत रोधकतेबाबत माहिती गोळा करण्यात येते व त्यानुसार विंधन विहीर, साधी विहीर, कुपनलिका यासाठी जागा निश्चित करण्यात येते. खारपाणी पट्टा क्षेत्रात पाण्याच्या गुणवत्तेबाबत माहिती काढण्यासाठी हे तंत्र वापरले जाते.
पिण्याचे पाणी तसेच सिंचनासाठी आवश्यक असलेल्या विंधन विहीरी/साधी विहीर यासाठी शेतकरी/वैयक्तिक/संस्थाना भू.स.वि.यंत्रणे मार्फत तांत्रिक मार्गदर्शन घेणेसाठी कार्यपध्दती –
1) जनतेच्या सेवेसाठी भूभौतिक सर्वेक्षणासाठी प्रती प्रकरण रु. 5000/- प्रमाणे सर्वेक्षण शुल्क आकारण्यात येते व पिण्याचे पाणी तसेच सिंचनासाठी आवश्यक असलेल्या विंधन विहीरी/साधी विहीर यांच्यासाठी मार्गदर्शन केले जाते.
2) लाभार्थींनी भूभौतिक सर्वेक्षणासाठी अर्ज व सर्वेक्षण करावयाच्या जागेचा 7/12 चा उतारा संबधित जिल्हा कार्यालयाकडे जमा केल्यानंतर सर्वेक्षण शुल्क चलनाव्दारे जमा करुन घेतले जाते.
3) तद्नंतर जिल्हा कार्यालयामार्फत संबधित विभागीय कार्यालयाकडे भूभौतिक सर्वेक्षणासाठी प्रस्ताव सादर केला जातो व विभागीय कार्यालयातील भूभौतिक तज्ञ सदर स्थळावर भूभौतिक सर्वेक्षण करुन अहवाल सादर करतात.