GSDAGSDAGSDA

विंधन विहिर जलभंजन

  • Home
  • विंधन विहिर जलभंजन
विंधन विहिर जलभंजन

संकल्पना

          राज्याचा 85 टक्के ग्रामीण पाणी पुरवठा हा भूजलावर अवलंबून आहे. ग्रामीण भागात पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी शासनामार्फत 60 मीटर खोली पर्यंत विंधण विहीरी खोदाई करण्यात येतात. 597 लीटर प्रति तास व त्या पेक्षा जास्त पाण्याची क्षमता असलेल्या विंधण विहीरी यशस्वी विंधण विहीर समजण्यात येतात व त्यावर हातपंप बसवून भूजलातील पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यात येते.

अयशस्वी झालेल्या विंधण विहीरीं व कमी पाणी क्षमता असलेल्या विंधण विहीरींच्या पाणी क्षमतेत वाढ करण्या करीता  उपाय योजना घेण्यात येतात. यापैकी एक जलभंजन ही आधुनिक तंत्रज्ञान असलेली पध्दत आहे.

विंधण विहीरीच्या वेगवेगळया भुस्तरात भेगा, फटी विकसीत केल्यास, तसेच अस्तित्वातील भेगा फटी यांचा विस्तार केल्यास, त्या स्वच्छ केल्यास जमीनीत पाणी मुरणे, पाण्याचा साठा वाढविणे व पाण्याची वहन क्षमता वाढविणे या प्रक्रिया सुलभ होतात आणि विंधण विहीरीची पाणी क्षमता वाढते.  यासाठी जलभंजन तंत्राचा वापर करण्यात येतो. राज्यात जलभंजन तंत्रज्ञानाचा वापर वर्ष 1989 पासून करण्यास सुरुवात झालेली आहे.

जलभंजन म्हणजे काय?

          विंधण विहीरीतील निश्चित केलेल्या वेगवेगळया भुस्तरामध्ये अतिउच्च पाण्याच्या दाबाचा वापर करुन भुस्तरातील/खडकातील भेगां, फटी विकसीत करणे, अस्त्विातील भेगा व फटींचा विस्तारीत करणे, भेगांची रुंदी वाढविणे या तंत्राला जलभंजन (हॅड्रोफॅक्चरींग) असे म्हणतात.

कार्यपध्दती

          कमी पाणी क्षमता असलेल्या विंधण विहीरीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी जलभंजन तंत्राचा वापर करण्यासाठी शास्त्रशुध्द पध्दतीने अभ्यास व माहिती असणे आवश्यक असते. त्यासाठी तांत्रिकदृष्टया योग्य विंधण विहीरीची निवड करणे आवश्यक आहे. विंधण विहीरीची खोली, भूस्तराचे प्रकार, वापरण्यात आलेला केसींग पाईप, केसिंग पाईचपी लांबी तसेच पाणी किती खोलीवर लागले आहे. याची माहिती असणे आवश्यक असते. त्या माहितीनुसार  विंधण विहीरीत नेमक्या कोणत्या ठिकाणी पँकर बसवायचा हे निश्चित करावयाचे असते. 

जलभंजन सुरु करणेपूर्वी खालीलप्रमाणे कार्यपध्दती अवलंबने आवश्यक ठरते.

  1. लोखंडी डमी केसिंग पाईप सोडून विंधण विहीर मोकळी असल्याची खात्री करणे. जेणेकरुन पाणबुडी पंप पॅकर सोडण्यास अडचणी येणार नाहीत.
  2. विंधण विहीरीची खोली व पाण्याची स्थिर पातळी मोजणे.
  3. यंत्रांवरील पाण बुडी पंपाद्वारे विंधन विहीरींची पाणी क्षमता चाचणी घेणे व उपसा चालु असताना पाण्याची स्थिर पातळीची नोंद घेणे.
  4. जलभंजनासाठी टँकरमधून आणलेले पाणी पिण्यास योग्य आहे याची खात्री करणे.
  5. पॅकर असेंब्लीच्या रबर चकत्या योग्य प्रकारे फुगतात किंवा कसे याची चाचणी घेणे.

          वरीलप्रमाणे तयारी झाल्यावर जलभंजनासाठी आवश्यकतेनुसार एकेरी अथवा दुहेरी पॅकर  संच वापरण्यात येतो. या प्रक्रियेमध्ये विंधण विहीरीत पॅकर कोणत्या खोलीवर बसविणे हे निश्चित करणे महत्वाचे आहे. त्यावरच जलभंजनाची यशस्वीतता अवलंबून असते. पॅकर असेंब्ली निश्चित केलेल्या खोली पर्यंत विंधण विहीरीत उतरवून हॅड्रॉलीक हॅण्ड पंपाच्या सहाय्याने पॅकर रबर फुगवून घट्ट बसविण्यात येते. पॅकर असेंब्ली नेहमी केसिंग पाईपच्या खाली  बसविण्यात येते. पॅकर घट्ट बसविण्यासाठी हायड्रॉलीक प्रेशर 300 ते 350kg/cm2  इतका देण्यात येतो. पॅकर घट्ट बसविल्यानंतर प्रत्यक्ष जलभंजन कामास सुरुवात होते.

          पाण्याच्या टँकरमधील पाणी फिडर पंपाव्दारे जलभंजन पथकावरील उच्च दाब निर्माण करणाऱ्या पंपास पुरविले जाते व त्या पंपाव्दारे  पाणी विंधण विहीरीत उच्च दाबाखाली (40 ते 80 kg/cm2) सोडण्यात येते. पॅकरच्या खालील भागात दाबाने पाणी जावू लागल्यानंतर पाण्याचा दाब वाढत जातो व विशिष्ट मर्यादेपर्यंत दाब निर्माण होवून, अचानक दाब कमी होतो. हया अती उच्च दाबाच्या क्षणी भुस्तरात भंजनाची प्रक्रिया सुरु होते व पाणी भूस्तराच्या क्षीण भागात, भेगा, फटीमध्ये उच्च दाबाने शिरते. त्यावेळी उच्चदाबाची नोंद घेण्यात यावी. त्याला Break down pressure म्हणतात. उच्चदाब कमी कमी होवून नंतर स्थिर दाबावर फटीच्या भेगांच्या विस्ताराची प्रक्रिया सुरु होते. हया दाबाला Fracture Extention Pressure म्हणतात.

          ही प्रक्रिया किमान अर्धा तास चालू ठेवून त्याची नोंद घेणे आवश्यक आहे. फटीचा विस्तार झाल्यानंतर विंधण विहीरीत जाणारे पाणी  बंद करावे. पॅकर खालील पाणी विशिष्ट दाबावर स्थिर होते. त्यांची नोंद घ्यावी. त्याला Shut Down Pressure म्हणतात. नंतर पाण्याचा दाब कमी करण्यासाठी बाहय मार्ग (Bypass) उघडून दाबाखालील पाणी बाहेर सोडावे. प्रक्रिये वेळी विंधण विहीरीत सोडलेल्या पाण्याइतके पाणी उपसून घ्यावे व विंधण विहीरीची जलभंजनानंतर पाणी क्षमता चाचणी घ्यावी. जलभंजन प्रक्रियेपूर्वी विंधण विहीरीची पाणी क्षमता व प्रक्रियेनंतर घेतलेली पाणी क्षमता याचे येणाऱ्या प्रमाणास क्षमता वाढीचे प्रमाण म्हणतात. उदा.100 लिटर प्रती तास क्षमता असलेल्या विंधण विहीरीची क्षमता 400 लिटर प्रती तास वाढल्यास त्याचे प्रमाण 1:4 राहील.

          सर्वसाधारणपणे जलभंजन प्रक्रिया वरीलप्रमाणे करण्यात येत असली तरी प्रत्येक विंधण विहीरीत पाणी सोडण्याचे प्रमाण, प्रक्रियेचा अवधी, यशस्वीता इ.बाबी  वेगवेगळया असू शकतात. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडे एकूण 14 यंत्रे होती त्यापैकी 3 यंत्रे निर्लेखित करण्यात आलेली असुन 11 यंत्रे उपलब्ध आहेत. सदर यंत्राव्दारे आतापर्यंत 20616 जलभंजनाची कामे झालेली आहेत.  तथापि, शासनाच्या धोरणानुसार १५ वर्षापेक्षा जास्त आयुष्यमान झालेली यंत्रे निष्कासित करणेबाबत सूचना आहेत. त्याबदली अत्याधुनिक यंत्रे खरेदीचा प्रस्ताव शासनास सादर केलेला आहे. त्यामध्ये जलभंजन कामाची यशस्वीतता वाढविणेसाठी बाजारातील अद्यावत आधुनिक बोअरवेल कॅमेरा प्रस्तावित आहे.

जलभंजन कामाचे कमाल दर-

          संचालनालयाचे परिपत्रक क्र.आवेधन/कक्ष-2/विं.वि जलभंजन दर निश्चिती/पं.क्र. 77/ 1470/2023 दिनांक 29.3.2023 नुसार शासकीय यंत्रासाठी रु.14000/- व खाजगी यंत्रासाठी रु.20000/- इतके दर शासनाने निश्चित केले आहेत.

योजनेचे फायदे –

  • कमी पाणी क्षमता असलेल्या विंधण विहीरींचे जलभंजन केल्यास विंधण विहीरींची पाणी क्षमता वाढविणेस मदत होते. यशस्वीतेचे प्रामण ७१% आहे.
  • जलभंजन केल्यामुळे पाणी क्षमता वाढल्यास नवीन विंधन विहीर घेण्याची आवश्यकता भासत नाही. त्यामुळे नवीन विंधण विहीर घेण्यासाठी लागणाऱ्या खर्चात बचत होते.
  • विंधण विहीरीची पाण्याची क्षमता वाढल्यास पिण्याच्या पाण्याची टंचाई काही अंशी कमी होते.
Choose Demos Submit a Ticket Purchase Theme

Pre-Built Demos Collection

Consultio comes with a beautiful collection of modern, easily importable, and highly customizable demo layouts. Any of which can be installed via one click.