सौर ऊर्जेवर आधारीत दुहेरी पंप लघु नळ पाणी पुरवठा योजना
सदर योजना शासन निर्णय क्र. ग्रापापु-५३१०/प्र.क्र.२१७/पापु-१५, दिनांक २१ ऑगस्ट, २०१० व त्यानंतर शासन निर्णय क्र. पापुस्व ग्रापापु-५३१०/प्र.क्र.२१७/पापु-१५, दिनांक २९ डिसेंबर २०११ व शुध्दीपत्रक दि. १७ ऑक्टोबर २०१२ व शासन निर्णय क्रमांक लपापु-२०१६/ प्र.क्र. ०६/पापु-१५, दिनांक २१.०१.२०१६ च्या मार्गदर्शक सुचनानुसार राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत व्याप्ती अंतर्गत राबविण्यात येत आहेत.
सदर योजनेमध्ये विद्युत ऊर्जेवर चालणाऱ्या १ अश्वशक्तीच्या पाणबुडीपंपा ऐवजी सौरऊर्जेवर चालणारा पाणबुडी पंप बसवून हया योजना राबविण्यात आल्या असून योजनेतील उर्वरीत बाबी संमातर आहेत.या योजनेची आर्थिक कमाल मर्यादा रुपये ५.१०लक्ष आहे. सदर कार्यक्रम जिल्हा परिषदे अंतर्गत उप अभियंता(यां), यांत्रिकी उपविभाग, जिल्हा परिषद या कार्यालयामार्फत राबविण्यात येत आहे.राज्यामध्ये वर्ष २००९-१० पासून २०१६-१७ पर्यंत ३९३५ सौर उर्जेवर आधारीत दुहेरी पंप नळ पाणी पुरवठा योजना राबविण्यात आलेल्या आहेत.
सौर दुहेरी पंप योजना – स्त्रियांसाठी एक वरदान
भारतातील ७५% पेक्षा अधिक लोकसंख्या ही खेडयात राहते व ८५ % ग्रामीण भागाला भूजलावर आधारीत पाणी पुरवठा केला जातो. म्हणूनच ग्रामीण भागातील पाणी पुरवठयासाठी विंधण विहिरींवर इंडिया मार्क-II चा हातपंप हा महत्त्वाचा घटक आहे.आपणास विदितच आहे की, उन्हाळयात पाणी पातळी खोल गेल्यामुळे हातपंपाव्दारे पाणी उपसा करणेस अडचणी निर्माण होतात. जर पाणी पातळी हातपंपाने पाणी उपसण्याच्या मर्यादेच्या खाली म्हणजेच ३६ मी. च्या खाली गेल्यास हातपंप कार्यरत राहत नाहीत. विंधण विहिरीत ३६ मी.च्या खाली पाणी असतांनाही लोकांना पाणी पिण्यास उपलब्ध होत नाही, असे झाल्याने त्या भागात पाणी टंचाई घोषीत करण्यात येते. यामुळे ग्रामीण भागातील स्त्रियांना अडचणींना सामोरे जावे लागते.भारतीय लोकसंस्कृतीत ग्रामीण भागात पाणी भरण्याचे काम प्रामुख्याने स्त्रियांनाच करावे लागते. त्यामुळे स्त्रियांना नळाव्दारे पाणी मिळविण्यासाठी भटकंती करावी लागते.वरील परिस्थितीवर मात करण्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत कार्यरत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत दुहेरी पंप योजना अंमलात आणली. सदर योजनेत हातपंप अस्तीत्वात असलेल्या ५००० ली. प्रती तासाी क्षमता विंधण विहिरीवर हातपंपासमवेत १ एच. पी. क्षमतेचा पाणबुडी पंप बसविण्यात येतो. सदर पाणबुडी पंपाव्दारे जमिनीपासून ३ मीटर उंचीवर असलेल्या ५००० ली. क्षमतेच्या पाणी साठवण टाकीमध्ये दिवसा पाणी संकलीत केले जाते व तेथून जवळच्या घरांना दिवस व रात्री नळाव्दारे पाणी पुरवठा केला जातो. पावसाळयात जवळच असलेल्या घरांवरील पावसाचे पाणी संकलीत करुन पूनर्भरणाची व्यवस्था करता येते.अशाप्रकारे हातपंप बंद असेल त्यावेळेस पाणबुडी पंपाव्दारे पाणी पुरवठा केला जातो. जेव्हा जेव्हा पाणबुडी पंप बंद असेल तेव्हा हातपंपाव्दारे पाणी पुरवठा सुरळीत राहतो. योजनेसाठी पूर्वी पाणबुडी पंप हा विद्युत ऊर्जेवर चालणारा असून कालांतराने त्याऐवजी सौर उर्जेवर आधारीत चालणारा सौर ऊर्जा पंप वापरण्यात येतो.
योजनेचे मुख्य घटकभाग खालीलप्रमाणे आहेत :-
- उच्च क्षमतेची विंधण विहिर / कुपनलिका (जिची पाणी आवक क्षमता कमीत कमी २००० ली. प्रति तास आहे)
- सौर उर्जेवर चालणारा पाणबुडी पंप (सौर पॅनेल सहीत)
- एच. डी. पी. ई. (५००० ली. क्षमतेची) पाणी साठवण टाकी.
- पाणी साठवण टाकी ठेवण्यासाठी ३ मी उंचीचा लोखंडी मनोरा
- साधारण: ३०घरांसाठी वितरण नलिका व्यवस्था
- भूजल पूर्नभरण्याच्या दृष्टीने पाऊस पाणी संकलन व्यवस्था, इ.
यशोगाथा – सौर उर्जेवर आधारित लघु नळ पाणी पुरवठा योजना
१. गावाचे नाव – पेविमुरांडा, तालुका – चार्मोशी, जिल्हा – गडचिरोली पेविमुरांडा हे गाव आदिवासी व नक्षल प्रभावित असून दाट जंगलात वसले आहे. एकूण घरांची संख्या – ५०,लोकसंख्या – ६३० आस्तित्वातील पाणी पुरवठा साधने – साध्या विहिरी ३, हातपंप ४.
उन्हाळ्यात गावातील साध्या विहिरींना पाणी नसते. तसेच सदरच्या विहिरी वस्ती पासून सुमारे ४०० मिटर लांब असल्याने महिलांना तेथून पाणी आणणे कष्टप्रद आहे. गावा मध्ये नळाव्दारे पाणी पुरवठा योजना अस्तित्वात नव्हती.गावतील उच्च क्षमतेच्या विंधण विहिरीवर सौर उर्जेवर आधारित लघुनळ पाणी पुरवठा योजना राबविण्यात आली आहे. आता गावा मध्ये ४ सार्वजनिक नळ कोंडाळे आणि ३० घरांना नळाव्दारे पाणी पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे पाण्यासाठीचे कष्ट कमी झाले आहेत.
२. गावाचे नाव – चांगेरा, तालुका – गोंदिया, जिल्हा – गोंदिया
चांगेरा हे गाव आदिवासी व नक्षल प्रभावित असून दाट जंगलात वसले आहे.
एकूण घरांची संख्या – २४६,
लोकसंख्या – १३६४.
आस्तित्वातील पाणी पुरवठा साधने – हातपंप ११.
उन्हाळ्यात जवळपासच्या साध्या विहिरींना पाणी नसते व विंधण विहिंरींच्या पाण्याची पातळी खोल जात असल्याने स्त्रीयांना हातपंपाचे पाणी काढणे कष्टप्रद होत. गावा मध्ये नळाव्दारे पाणी पुरवठा योजना अस्तित्वात नव्हती.गावतील उच्च क्षमतेच्या विंधण विहिरीवर सौर उर्जेवर आधारित लघुनळ पाणी पुरवठा योजना राबविण्यात आली आहे. आता गावा मध्ये २ सार्वजनिक नळ कोंडाळे आणि १५२ घरांना नळाव्दारे पाणी पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे पाण्यासाठीचे कष्ट कमी झाले आहेत.
सौर ऊर्जेवर आधारीत नळ पाणी पुरवठा योजनांच्या अंमलबजावणी बाबत मार्गदर्शक सूचना