महाराष्ट्रात पर्जन्यमानाच्या अनियमिततेमुळे दरवर्षी टंचाई परिस्थिती उद्भवते. गावांतील विहिरी कोरडया पडल्याने तसेच काही ठिकाणी विंधण विहिरींची पाणी पुरवठयाची क्षमता कमी झाल्याने पेयजलाची टंचाई निर्माण होते. याशिवाय राज्याच्या डोंगराळ भागात पर्जन्यमान समाधानकारक असूनही, जमिनीला जास्त उतार असल्याने पावसाचे अधिकांश पाणी वाहून जाते. या भागात भूस्तरातील सच्छिद्रता कमी असल्याने पाण्याच्या पुनर्भरणाचे होणारे प्रमाणही अत्यल्प असते. अशा परिस्थितीत राज्यातील बहुतेक जिल्हयातील काही गावांना पिण्याचे पाणी टँकर किंवा बैलगाडीद्वारे पुरवावे लागते. अशा गावांचा पेयजल प्रश्न कायमस्वरुपी सोडविणे आवश्यक असल्याने शासनाने जलसंधारणाच्या महत्वाकांक्षी कार्यक्रमाची अंमलबजावणी सन १९९२-९३ पासून सुरु केली.या कार्यक्रमाचा एक घटक म्हणून पेयजल उद्भवांना बळकटी आणण्याकरिता भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने अपारंपारिक प्रकल्पांची अंमलबजावणी सुरु केली. पिण्याच्या पाण्याच्या विहिरी किंवा तत्सम उद्भव एकदा पूर्ण झाले की, त्या ठिकाणी सातत्याने उपसा होऊन पाण्याच्या अत्याधिक वापरामुळे उन्हाळ्यात त्यांना पाणी कमी पडू लागते. त्यावर झालेला खर्च उपयोगी पडत नाही म्हणून अशा अस्तित्त्वातील उद्भवांना बळकटी आणण्यासाठी खालीलप्रमाणे अपारंपारिक प्रकल्प राबविण्यात येतात.
स्त्रोत बळकटीकरणाच्या अपारंपारीक उपाय योजना :- भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडुन अपारंपारीक योजनांचा वापर करुन अस्तित्वातील भूजल स्त्रोतांचे बळकटीकरण करुन त्याची क्षमता वाढविण्यासाठी खालील योजना राबविण्यात येतात.
१ |
फ्रॅक्चर सिल सिमेंटेशन (एफ.एस.सी.) |
१००१ |
२. |
जॅकेटवेल टेक्नीक (जे. डब्ल्यु.टी.) |
६४१ |
३. |
बोअर ब्लास्ट टेक्नीक (बी.बी.टी.) |
५४९ |
४. |
जलियभंजन (एच. एफ.) |
१९८४९ |
फ्रॅक्चर सिल सिमेंटेशन :-
भूशास्त्रीय आणि भौगोलिक परिस्थितीप्रमाणे, काही स्थळी नाल्याचे खालील प्रस्तरातून सतत भूजल वहन होत असते. त्यामुळे नाल्याचे बाजूस असलेल्या उद्भव विहिरीस आवश्यक प्रमाणात पाणी उन्हाळयापर्यंत उपलब्ध राहत नाही. भूजलाचे वहन रोखल्यास, हे वाहून जाणारे भूजल, विहिरी नजिकचे परिसरात साठून राहून विहिरीत आवश्यकतेप्रमाणे पाझरते आणि पर्यायाने पाण्याच्या साठयात वाढ होण्यास मदत होते.
प्रस्तुत, प्रकल्पांतर्गत उद्भव विहिरींच्या खालच्या बाजूस ठराविक अंतरावर नाल्याच्या पात्रात पक्क्या प्रस्तरापर्यंतच्या खोलीची विंधण छिद्रे घेण्यात येतात. सदर विंधण छिद्रात उच्च दाबाने सिमेंटचे द्रावण सोडण्यात येते, जॅकेटवेल भूप्रस्तरातील भेगा व सांधे सिमेंटमुळे बूजविले जावून भूपृष्ठाखाली भूमिगत बंधा-यासदृष्य जलावरोधी भिंत तयार होते, त्यामुळे भूजल साठयात वृध्दी होते.
जॅकेटवेल:-
नळ पाणी पुरवठा योजनेच्या उद्भवाची स्थिती, त्या भागातील भूस्तरावर अवलंबून असते. भूपृष्ठाखालील सच्छिद्र पाषाणस्तर पाणी साठून ठेवतात आणि भेगा, फटी, सांधे असलेले प्रस्तर हे भूजल वाहून नेण्यासाठी मदत करतात. उद्भव विहिरी भोवतीच्या परिसरात नैसर्गिक प्रक्रियेमुळे अशा प्रकारची अनुकूल भूशास्त्रीय परिस्थिती असल्यास, भूजल पुनर्भरण प्रक्रियेने विहिरीस पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध राहते. मात्र काही ठिकाणी खडकातील सच्छिद्रता मुळातच कमी असते, तसेच भेगा किंवा फटी एकमेकांशी नैसर्गिकरित्या जोडल्या गेलेल्या नसतात, त्यामुळे पाण्याचा साठा आणि वहन प्रक्रिया मंदावते. परिणामत: उद्भव विहिरीस पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होत नाही आणि कालपरत्वे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते.
खडकांमध्ये कृत्रिमरित्या सच्छिद्रता निर्माण करुन उद्भव विहिरीची पाणी पुरवठयाची क्षमता वाढविण्यासाठी जॅकेटवेल या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. या प्रकल्पांतर्गत उद्भव विहिरीभोवतीच्या परिसरात भूशास्त्रीय परिस्थितीप्रमाणे वर्तुळाकारात विंधणछिद्रे घेवून विहिरीभेवती एक प्रकारे जॅकेट तयार करण्यात येते. विंधण छिद्राची खोली विहिरीच्या खोलीपेक्षा थोडी कमी असते. सदर विंधण छिद्रांमध्ये दारूगोळा भरुन स्फोट करण्यात येतो. त्यामुळे भूपृष्ठाखालील स्तरांची सच्छिद्रता वाढून भेगा व फटी विहिरीशी जोडल्या जातात. त्यामुळे भूजल वहन प्रक्रियेचा वेग वाढून विहिरी भोवतीच्या प्रस्तरातील भूजल विहिरीत पाझरते. पर्यायाने विहिरीच्या पाणी पुरवठा क्षमतेत वाढ होते.
बोअर ब्लास्ट टेक्निक :-जास्त किंवा निश्चित पर्जन्यमान असूनही काही भागातील उद्भव भूस्तरातील सच्छिद्रता कमी असल्याने कोरडे पडतात. असा भूस्तर कृत्रिमरित्या सच्छिद्र करुन, त्यांची साठवण क्षमता वाढविणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. या तंत्रामध्ये उद्भवाच्या परिसरामध्ये आवश्यक त्या खोलीची विंधण छिद्रे घेऊन त्यामध्ये सुरुंगाव्दारे स्फोट करण्यात येतो. स्फोटामुळे परिसरातील भूस्तर सच्छिद्र होवून त्याची साठवण क्षमता वाढल्याने पेयजल उद्भवास अतिरिक्त भूजल उपलबध होते.
स्ट्रीम ब्लास्टिंग :-
पिण्याच्या पाण्याचा उद्भव विहिरी बव्हंशी नाल्याच्या काठावर असतात. काही ठिकाणी नालापात्राच्या भूपृष्ठाखालील भूजल वहन प्रणाली, विहिरींशी जोडली गेली नसल्याने त्यातून वाहून जाणा-या भूजलाचा उपयोग उद्भव विहिरीस होत नाही.
स्ट्रीम ब्लास्टिंग या तंत्रामध्ये नालापात्रात, भूशास्त्रीय दृष्टीकोनातून आवश्यक त्या प्रमाणात विंधणछिद्रे घेण्यात येतात व त्यामध्ये दारुगोळा भरुन स्फोट करण्यात येतो.त्यामुळे नालापात्रतील भूप्रस्तरात कृत्रिमरित्या भेगा व फटी निर्माण होऊन, तसेच अस्तित्वात असलेल्या भेगा व फटींचा विस्तार होऊन अतिरिक्त भूजल साठा निर्माण होण्यास मदत होते, आणि त्याचा लाभ नालाकाठावरील उद्भव विहिरीस होतो.
जलियभंजन (हैड्रोफ्रॅक्चरिंग) :-
ग्रामिण भागात पिण्याच्या पाण्यासाठी विंधण विहिरींचा मोठया प्रमाणात वापर करण्यात येतो. भूशास्त्रीय परिस्थिती योग्य असूनही काही ठिकाणी विंधण विहिरीस आवश्यक त्या प्रमाणात पाणी उपलब्ध होत नसल्याचे निदर्शनास येते. याचे प्रमुख कारण म्हणजे भूजल पुनर्भरणाची अपूर्णता व भूशास्त्रीय असलगता. काही ठिकाणी पाषाणामध्ये भेगा किंवा सांध्याचे प्रमाण अत्यल्प असते. तसेच या भेगा व सांधे भूजल साठयाशी जोडलेल्या नसल्याने किंवा त्यांची सभोवतालच्या भूजल वहन मार्गाशी संलग्नता नसल्याने, ते भूजल पुनर्भरण व वहन प्रक्रियेतून अलग राहतात. त्यामुळे अशा ठिकाणी घेतलेल्या विंधण विहिरीस अपेक्षेप्रमाणे पाणी पुरवठा क्षमता रहात नाही.
उपनिर्देशित परिस्थितीत कमी क्षमतेच्या विंधण विहिरींतील भेगा व फटी कृत्रिमरित्या विस्तारित केल्यास किंवा एकमेकांस जोडल्या गेल्यास, त्या भेगा व फटी भोवतालच्या भूजल वहन मार्गाशी किंवा भूजल साठयाशी निगडीत होतात. त्यामुळे विंधण विहिरींची पाणी पुरवठयाची क्षमता वाढते. हायड्रोफ्रॅक्चरिंग या तंत्रात कमी क्षमता असलेल्या विंधण विहिरींमध्ये हायड्रोलीक पॅकर वापरुन अत्युउच्च दाबाखाली पाणी सोडण्यात येते. त्यामुळे खडकामध्ये अस्तित्वात असलेल्या भेगा स्वच्छ होतात, तथा सदर भेगा विस्तारीत होवुन त्या पाणी वाहून आणणा–या भेगांशी संलग्न होतात, तसेच काही ठिकाणी खडकामध्ये नव्याने भेगा व फटी तयार होतात. पर्यायाने विंधण विहिरींच्या पाणी पुरवठयाच्या क्षमतेत लक्षणीय वाढ होते.
जलियभंजन (हायड्रोफ्रॅक्चरिंग) पथक :-जलीयभंजन प्रक्रियेत जलधारक क्षमता कमी असलेल्या अथवा ज्या विंधण विहिरींची पाण्याची क्षमता कालांतराने कमी होते अशा अस्तित्वातील विंधण विहिरीत अतिउच्च दाबाने पाणी सोडण्यात येते. त्यामूळे खडकात असलेल्या भेगा स्वच्छ होतात, तर काही भेगा विस्तारित होतात. तसेच काही ठिकाणी खडकामध्ये नव्याने भेगा – फ़टी तयार होवून त्या पाणी वाहून आणणा–या भूजल प्रणालीतील भेगांशी जोडल्या जातात. त्यामुळे विंधण विहिरीच्या पाणी पुरवठा क्षमतेत वाढ होते.