हायब्रीड तंत्रज्ञान आधारित स्वयंचलीत सौर ऊर्जा नळ पाणी पुरवठा योजना
हायब्रीड तंत्रज्ञान आधारित स्वयंचलीत सौर ऊर्जा नळ पाणी पुरवठा योजना व त्यांचे रिमोट मॉनिटरींगद्वारे व्यवस्थापन
पार्श्वभूमी –
पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या अधिनस्त भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने सन 2009 मध्ये सौर उर्जेवर आधारीत दुहेरी पंप नळ पाणी पुरवठा येाजना विकसित केली आहे. राज्यात सन २०२४ अखेरपर्यंत विंधन विहिरिंवर ५२७१ सौर दुहेरी पंप पाणी पुरवठा पूर्ण केल्या आहेत. या योजना अल्पावधीत स्थानिक समुदायासाठी उपयुक्त तसेच लोकप्रिय झाल्याने, केंद्र शासनाने भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेची भारतातील इतर बारा नक्षलग्रस्त राज्यांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी सहाय्य एजन्सी म्हणुन नेमणुक केली होती.
विद्युत उर्जेची बचत करण्यासाठी पाणी पुरवठा योजनांवरील विद्युत पंपाचे सौर पंपात रुपांतर करणे ही जागतिक गरज आहे. हा मुद्दा लक्षात घेऊन भू.स.वि.यं.तील यांत्रिकी अभियंत्यांनी सौर उर्जेवर आधारीत अद्यावत प्रगत तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यासाठी पुढाकार घेतला. यासाठी यंत्रणेतील अभियंत्यांना सौर उर्जेवर आधारीत पाणी पुरवठा योजनांचे तांत्रिक व अद्ययावत सौर ऊर्जा प्रणालीबाबत युनिसेफच्या आर्थिक सहाय्याने आणि नॅशनल इंन्स्टिट्युट ऑफ सोलार एनर्जी (NISE) गुडगाव यांच्या तांत्रिक सहाय्याने देण्यात आले आहे. तसेच, नॅशनल पॉवर ट्रेनिंग इंन्स्टिट्युट (NPTI) गुवाहाटी येथे आयोजित केलेल्या “सौर उर्जा प्रकल्पांची अंमलबजावणी आणि देखरेख आणि कृत्रिम बुध्दिमत्तेवर आधारीत सौर योजना व्यवस्थापन” या विषयावरीलही प्रशिक्षण देण्यात आले आहे. भू.स.वि.यं. कडील यांत्रिकी अभियंत्यांनी वरील दोन्ही तंत्रज्ञान आत्मसात केले आहे. त्यांना पूर्व अनुभव असल्याने त्यांनी नाविन्यपूर्ण सौर उर्जेवर आधारीत स्वयंचलित अद्यावत हायब्रीड तंत्रज्ञानाचा वापर, विद्युत उर्जेची बचत, योजना शाश्वत करुन ग्रामीण जनतेस आवश्यक पाणी पुरवठा करणेकडे लक्ष केंद्रित केले आहे. पुणे जिल्ह्यातील ४ ग्रामपंचायतीमध्ये अशा ०६ योजना यशस्वीरीत्या कार्यरत असून राज्यभर अशा प्रकारच्या योजना वाढविण्यासाठी तांत्रिक टिपण सादर करण्यात येत आहे.
प्रस्तावना:
राज्यातील स्वतंत्र व प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांमध्ये प्रामुख्याने विद्युत उर्जेवर आधारीत पंप वापरात आहेत. सदरील योजनांची विद्युत देयके मोठया रक्कमेची येतात. ग्रामपंचायतींना या देयकांची वेळोवेळी अदायगी करणे जिकरीचे होते. योजना चालू असूनसुध्दा केवळ वीज देयक थकित असल्याने योजना बंद राहते व पाणी पुरवठा खंडीत होतो. त्या योजनांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून सौर उर्जेवर आधारित हायब्रीड कंट्रोलर प्रणालीचा वापर करता येणे शक्य आहे.
यामध्ये हायब्रिड कंट्रोलर निर्माण झालेल्या सौर उर्जेचा प्राधान्याने वापर करण्यासोबत भूजल/पाणी उपसा, दुरस्त ठिकाणाहून योजनेचे संचालन, पाण्याची टाकी भरल्यास आणि रिकामी झाल्यास पंप स्वयंचलित चालू बंद करणे, इत्यादी सुलभ घटकांचा समावेश आहे. तसेच या प्रणालीद्वारे प्रत्यक्षात पाणी उपस्याची नोंद करणे, इत्यादी बाबी सुद्धा नोंद करण्यात येतात, त्याच प्रमाणे कार्बन उत्सर्जनात झालेली घट हि बाब सुद्धा भविष्यामध्ये नोंदविणे शक्य आहे.
नाविन्यपूर्ण अद्यावत स्वयंचलित हायब्रिड पंप कंट्रोलर आणि रिमोट मॉनिटरींग तंत्रज्ञान
सौर उर्जेवर चालणाऱ्या योजनांना प्रचलित नेट मीटरिंग पद्धती अवलंबली गेली असून त्याजोडीला अद्यावत हायब्रीड कंट्रोलर प्रणाली सुद्धा उपलब्ध आहे. नेट मीटरींग व हायब्रीड कंट्रोलर प्रणाली मधील ठळक बाबींची माहीती खालील प्रमाणे आहे.
क्र.
नेट मीटरींग प्रणाली
हायब्रीड कंट्रोलर प्रणाली
1.
जेव्हा सौर उर्जेची निर्मिती पंप कार्यान्वित करण्याकरीता आवश्यकतेपेक्षा जास्त होते, तेव्हा अतिरिक्त उर्जा ग्रीडद्वारे विद्युत पारेषण मंडळास निर्यात केली जाते. तसेच जेंव्हा पंप कार्यान्वित करणेसाठी सौर उर्जा आवश्यकतेपेक्षा कमी पडते, तेव्हा अतिरिक्त उर्जा ग्रीडद्वारे पारेषण मंडळाकडून आयात केली जाते.
हायब्रिड कंट्रोलर निर्माण झालेल्या सौर उर्जेचा प्रथम प्राधान्याने पुर्ण वापर करते. ज्यावेळी पंप चालविणेकरीता निर्माण झालेली सौर उर्जा पुरेशी नसेल, त्यावेळी आवश्यक अतिरिक्त उर्जा ग्रीड कडून घेऊन पंप अखंडित चालू ठेवते. वरीलप्रमाणे स्वयंचलित हायब्रीड कंट्रोलर सौर आणि ग्रीड उर्जेचा सहभागी (Sharing) वापर करुन पंप पूर्ण क्षमतेने चालू ठेवतो.
2.
नेट मिटरींगमुळे देयकात सुमारे 50 ते 70% बचत होते.
या प्रणाली मध्ये सौर उर्जेला प्रथम प्राधान्य असल्यामूळे आवश्यकता असेल तरच अतिरिक्त विद्युत उर्जेचा वापर करण्यात येतो त्यामुळे विद्युत देयकात सुमारे 50 ते 90% बचत होते
3.
काही कारणाने एखादया वेळेस दिवसा विद्युत उर्जा खंडीत झाल्यास संपुर्ण प्रणाली सुरक्षेसाठी बंद होते. त्यावेळी सौर उर्जा निर्माण होऊनही त्याचा वापर करता येत नाही. त्यामूळे योजना बंद राहते. ही नेट मिटरींग प्रणालीमधील उणिव आहे.
सौर व ग्रीड उर्जेपैकी एक स्त्रोत खंडीत झाल्यास दुस-या स्त्रोतावर पंप अखंडीत चालतो. दिवसा सौर उर्जा निर्मिती चालू असतांना विद्यत उर्जा खंडीत झाल्यास, पंप सौर उर्जेवर चालू राहतो. सौर उर्जा खंडीत झाल्यास पंप विद्युत उर्जेवर चालतो. हा नेट मिटरींग पेक्षा जास्तीचा फायदा आहे.
4.
नेट मिटरिंगसाठी विद्युत पारेषण मंडळाचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे.
स्वयंचलित हायब्रिड कट्रोलर प्रणाली स्थापित करण्यासाठी पारेषण मंडळाच्या नाहरकत प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.
हायब्रीड कंट्रोलर प्रणाली:
विद्युत पुरवठा खंडीत झाल्यानंतर सौर उर्जा उपलब्ध असून सुद्धा नेट मिटरींग प्रणालीद्वारे चालणारे पंप बंद पडतात, त्याच प्रमाणे नेट मिटरिंगसाठी विद्युत पारेषण मंडळाचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. याबाबींमुळे पाणी पुरवठा योजनांमध्ये सौर उर्जेवर आधारित हायब्रिड कंट्रोलर (Hybrid Controller) प्रणाली अवलंबणे योग्य राहील.
हायब्रीड कंट्रोलर प्रणालीतील घटक
हायब्रीड कंट्रोलर व IOT कंट्रोलर
हायब्रिड कंट्रोलर (Hybrid Controller) प्रणालीत मोटर कंट्रोलर (ड्राइव्ह) मुळे सौर पॅनलद्वारे निर्माण होणारी सौर उर्जा व विद्युत पारेषण मंडळाद्वारे प्राप्त विज या दोनही अपारंपारिक आणि पारंपारिक उर्जा वापरुन मोटर चालविणे शक्य होते. हया कंट्रोलरमध्ये सौर उर्जा आणि विद्युत उर्जा शेअरिंग बेसिसवर वापरुन पंपास आवश्यक तेवढी उर्जा पुरविली जाते. यामध्ये सौर /विद्युत उर्जेपैकी एक उर्जा खंडीत झाल्यास दुसऱ्या उपलब्ध उर्जेवर पंप कार्यान्वित राहतो. जसे दिवसा विद्युत उर्जा खंडीत झाल्यास, पंप उपलब्ध सौर उर्जेवर कार्यान्वित राहतो. या उलट रात्रीच्या वेळेस सौर उर्जा उपलब्ध नसल्याने पंप विद्युत उर्जेवर कार्यान्वित राहतो. दोन्ही प्रकारे विज उपलब्ध असल्यास सौर पॅनलद्वारे निर्माण होणा-या विद्युत उर्जेस प्रथम प्राधान्य दिले जाते. खराब हवामानामुळे किंवा इतर काही कारणांमुळे सौर पॅनलद्वारे कमी विद्युत उर्जा तयार होत असल्यास केवळ जेवढ़ी उर्जा कमी आहे तेवढीच विज विद्युत पारेषण मंडळाकडून घेतली जाते. अशा प्रकारे प्राधान्याने सौर उर्जेचा वापर होतो. या हायब्रीड सौर प्रणालीमुळे पारंपारिक विद्युत भारावरील खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होते.
विद्युत उर्जेवर कार्यान्वित राहतो. दोन्ही प्रकारे विज उपलब्ध असल्यास सौर पॅनलद्वारे निर्माण होणा-या विद्युत उर्जेस प्रथम प्राधान्य दिले जाते. खराब हवामानामुळे किंवा इतर काही कारणांमुळे सौर पॅनलद्वारे कमी विद्युत उर्जा तयार होत असल्यास केवळ जेवढ़ी उर्जा कमी आहे तेवढीच विज विद्युत पारेषण मंडळाकडून घेतली जाते. अशा प्रकारे प्राधान्याने सौर उर्जेचा वापर होतो. या हायब्रीड सौर प्रणालीमुळे पारंपारिक विद्युत भारावरील खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होते.
विद्युत ऊर्जेवर आधारित नळ पाणीपुरवठा योजनांचे सौर ऊर्जेवर आधारित नळ पाणीपुरवठा योजनांमध्ये रुपांतर केल्यामुळे योजनेची शाश्वतता वाढण्यास मदत व विद्युत उर्जेवरील खर्चात बचत होण्याबरोबर कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होणार आहे.
2.स्वयंचलित रिमोट मॉनिटरींग
अल्ट्रासोनिक सेन्सरद्वारे टाकीतील पाणी पातळीचे नियंत्रण
या घटकाचे खालील कार्य व फायदे होतात,
साठवण टाकी भरली की पंप आपोआप बंद होतो, तर टाकी रिकामी झाली की, पंप आपोआप सुरु होतो. यामुळे उर्जेची बचत होते. पाणी उपस्यावर नियंत्रण येते. पाणी वाया जात नाही. मशिनरीची झीज, नादुरुस्तीचे प्रमाण कमी होते. मनुष्यबळ कमी लागते.
पंपाची चालू, बंद वेळ मोबाईलवर पाहता येते. त्याच प्रमाणे आवश्यकते नूसार पंप चालु, बंद करण्याच्या वेळा निश्चित करता येतात.
दररोज गावातील नागरीकांना निरंतर पाणी मिळते. पाणी स्त्रोतांचा नियेाजनपूर्वक वापर व व्यवस्थापन केल्याने स्त्रोतांची शाश्वतता वाढते. साठवण टाकीची पाणी पातळी नियंत्रित ठेवल्याने पाणी ओव्हरफ्लो होत नाही.
3. डॅशबोर्ड
साठवण टाकीत किती लिटर पाणी पंपींग होते, पंप दररोज किती तास चालतो, किती सौर उर्जा निर्मिती झाली, ही माहिती संगणक व मोबाईलवर सर्वांना पाहता येते. त्यामुळे योजनेच्या कार्यप्रणालीचे निरिक्षण वेळोवेळी होत असल्याने संभाव्य नादुरुस्तीची पूर्वकल्पना येत असल्याने दुरुस्तीसाठी होणारा कालापव्यय टाळता येतो. मागील एक वर्षापर्यंतची माहिती सर्व्हरवर स्टोअर केली जाते. सदर माहीतीचे विश्लेषण करून योजनेची कार्यक्षमता वाढविण्याचे नियोजन करता येते.
4. स्वयंचलित सौर पॅनेल स्वच्छता कार्यप्रणाली
सौर पॅनेलवर धुळ बसल्याने सौर पॅनेलची क्षमता सुमारे 10% घटते. त्याकरीता दररोज पॅनेलची सफाई करणेसाठी मनुष्यबळाची आवश्यकता असते. मनुष्यबळाची उपलब्धता व त्यावरील खर्च कमी करणेकरीता सौर पॅनेल स्वयंचलित स्वच्छता कार्यप्रणालीचा वापर करण्यात येतो.
स्वयंचलित सौर पॅनेल स्वच्छता प्रणालीमध्ये दररोज पॅनेल पाण्याने साफ करण्याची वेळ निश्चित करुन पॅनेल आपोआप स्वच्छ करता येतात.
स्वयंचलित सौर पॅनेल स्वच्छता प्रणालीमुळे पॅनेलची दररोज स्वच्छता होत असल्याने, उर्जा निर्मितीमध्ये होणारी 10% घट थांबते. तसेच स्वच्छतेसाठी मनुष्यबळावरील खर्च व मनुष्यबळाचे नियेाजन करावे लागत नाही आणि पॅनेल स्वच्छतेचे सातत्य कायम राहते.
5.GSM based Digital फ्लोमिटर
GSM based Digital फ्लोमिटर यामुळे रियल टाईम पाणी उपस्याची माहिती डॅश बोर्डवर उपलब्ध होते.
सारांश:
अस्तित्वातील पाणी पुरवठा योजनांमध्ये सौर उर्जेवर आधारित हायब्रीड कंट्रोलर प्रणाली, स्वयंचलित रिमोट मॉनिटरींग प्रणाली आणि स्वयंचलित सौर पॅनेल स्वच्छता कार्यप्रणाली यांचा समावेश केल्यास ते योजनांच्या शाश्वततेसाठी निश्चितच फायद्याचे ठरेल. महाराष्ट्र राज्यामध्ये विद्युत उर्जेवर आधारित नळ पाणी पुरवठा योजनांवर नेट मिटरींग ऐवजी सौर उर्जेवर आधारीत स्वयंचलीत नाविन्यपूर्ण आधुनिक हायब्रीड तंत्राचा वापर आणि रिमोट मॉनिटरींगद्वारे शाश्वत नळ पाणी पुरवठा योजनांचे व्यवस्थापन केल्यास त्याचा ग्रामीण जनतेस निश्चितच फायदा होईल.
अस्तित्वातील सौर उर्जेवर आधारित पाणी पुरवठा योजनेमध्ये हायब्रीड कंट्रोलर, RMS (Remote Monitoring System), GSM based फ्लोमिटर, पाणी साठवण टाकी मधील अल्ट्रासोनिक सेन्सरद्वारे टाकीतील पाणी पातळीची नियंत्रण प्रणाली, सौर पॅनलची कार्यक्षमता वाढविणे करीता ॲटोमॅटीक पॅनल क्लिनींग प्रणाली पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील मौजे सारोळा, न्हावी 322, भांबवडे व सांगवी निधान या ४ गावांमध्ये 0६ योजनांवर प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आली आहे. त्यापैकी मौजे सारोळा, ता, भोर जि. पुणे येथे रावविण्यात आलेल्या योजनेची (यशोगाथा सोबत जोडपत्रामध्ये सादर केली आहे).
महाराष्ट्र राज्यात आणि देशांमध्ये सौर उर्जेवर आधारीत दुहेरी पंप लघु नळ पाणी पुरवठा योजना भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने प्रथम विकसित केली आणि सौर उर्जेवर आधारीत अद्यावत तंत्रज्ञान आत्मसात केले आहे. तसेच राज्य पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत जल जीवन मिशनच्या कार्यकारी समितीच्या दि. 08/02/2023 रोजीच्या बैठकीचे इतिवृत्तातील मुद्दा क्र. 20 अन्वये विद्युत पंपाचे सौर पंपात रुपांतर करणेच्या योजना राबविण्यासाठी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेला अंमलबजावणी यंत्रणा म्हणून मान्यता देणेकरिता समितीने मंजूरी दिली आहे. त्या अनुषंगाने जिल्हानिहाय प्रस्ताव मागविण्यात आलेले असून, 27 जिल्हयांमध्ये 64 योजनांची अंदाजपत्रके प्राप्त झालेली आहेत. अंमलबजावणीसाठी त्यास शासनाने मान्यता दिली आहे.
मौजे सारोळा तालुका – भोर जिल्हा पुणे येथील नळ पाणी पुरवठा योजनेमध्ये
सौर उर्जा आधारित हायब्रीड कंट्रोलरचा समावेश करणे
यशोगाथा
मौजे सारोळा भोर तालुक्यात असून पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेस भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या मुख्यालया पासून साधारणतः 45 कि.मी.अंतरावर आहे.
गावातील पिण्याच्या पाण्यासाठी अस्तीत्वातील विहिरी व हातपंपांद्वारे पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याने पुणे जिल्हा परिषदेमार्फत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत अंतर्गत वर्ष 2020-21 मध्ये पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत करण्यात आली असून नीरा नदीवरून 5 एच.पी क्षमतेच्या पंपाद्वारे पाणी जॅकवेलमध्ये नेण्यात येते. जॅकवेलमधून 5 एच.पी पंपाद्वारे पाणी जलशुध्दीकरण केंद्रात नेण्यात येते. जलशुध्दीकरण केंद्रात पाण्याचे शुध्दीकरण झालेनंतर ते 20 एच.पी. क्षमतेच्या पंपाद्वारे 250000 लीटर क्षमतेच्या साठवण टाकीत गावपातळीवर वितरणाकरीता साठविण्यात येते. गावाची लोकसंख्या 3800 असून जलजीवन मिशनच्या सुधारीत धोरणानुसार 55 LPCD अन्वये तसेच गावाच्या हद्दीतील व्यवसायांकरीता, जनावरे व इतर बाबींकरीता गावाची पाण्याची गरज प्रतिदिन सुमारे 260000 लीटर एवढ़ी आहे.
पाण्याची दैनंदिन गरज भागविण्याकरीता 20 एच.पी. क्षमतेच्या विद्युत पंपाद्वारे दररोज सुमारे 8 तास एवढया वेळ पंपींग करण्यात येते. तर 5 HP चे दोन्ही पंपाचे पंपिंग तास प्रत्येकी 10 तास इतके आहेत. सद्य:स्थितीत सदरचे दोन्ही पंप विद्युत उर्जेवर चालतात.
विद्युत देयकावरील होणारा मोठा खर्चाचा भार कमी करणेकरीता पुणे जिल्हा परिषदेमार्फत सारोळा येथे जल जीवन मिशन अंतर्गत नेट मिटरींग सौर प्रणाली प्रस्तावित करण्यात आली होती तथापी नेट मिटरींग सौर प्रणाली राबविणेकरीता पाणी पुरवठा योजनेचे विद्युत देयक रु. 2,62,000/- थकित होते. त्यामुळे ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त करणे शक्य नव्हते. याबाबत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडे तांत्रिक सल्ला मागितला असता, हायब्रीड सौर प्रणाली तुलनात्मक दृष्ट्या नेट मिटरींगपेक्षा अधिक उपयुक्त असल्याने भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत हायब्रीड सौर प्रणाली राबविणेकरीता तांत्रिक मार्गदर्शनकरुन 20 HP पंपाकरीता 15 कि.वॅट क्षमतेची हायब्रीड सौर प्रणाली बसविण्यात आली आहे.
चित्र – अल्ट्रासोनिक वॉटर लेव्हल सेन्सर
सद्य:स्थितीत सारोळा येथील पाणी पुरवठा योजनेचे स्वतंत्र मीटर नसल्याने विज देयकावरुन पाणी पुरवठा योजनेकरीता होणारा विजेचा वापर व होणारी बचत ही माहिती काढणे शक्य नाही. पाणी पुरवठा योजनेसाठी स्वतंत्र विज मीटर घेण्याची कार्यवाही ग्रामपंचायत स्तरावरून करण्यात येत आहे. तथापी रिमोट सेन्सींग प्रणालीद्वारे प्राप्त होणा-या माहिती वरुन सौर/ एमएसईबी विजेचा प्रत्यक्ष झालेला वापर व होणारी बचत याचा माहे एप्रिल 24 ते जून 24 या कालावधीतील प्रत्येक दिवसाचा अहवाल काढण्यात आला आहे. सदर प्राप्त माहितीवरून माहे एप्रिल 24 ते जून 24 या कालावधीतील सौर/ एमएसईबी विजेचा झालेला वापर व होणारी बचत याचा गोषवारा काढण्यात आला असून त्याचा गोषवारा खालील प्रमाणे आहे.
महिना
पंपाद्वारे वापर एकूण विद्युत उर्जा kWh
(युनिट)
एमएसईबी कडून घेतलेली विज kWh (युनिट)
सौर पॅनलद्वारे घेतलेली विज kWh
(युनिट)
एमएसईबी कडून घेतलेल्या विजेची टक्केवारी
सौर पॅनलद्वारे घेतलेल्या विजेची टक्केवारी
विज देयकात होणारी प्रती माह बचत रुपये
एप्रिल 24
3517.31
710.53
2806.77
24.2 %
75.8 %
28067.70
मे 24
2372.34
268.86
2103.48
11.80 %
88.20%
21034.80
जून 24
2063.00
788.33
1247.67
48.00 %
52.00 %
12476.70
सदर योजनेवर प्रायोगीक तत्वावर रिमोट सेन्सींगद्वारे योजनेच्या प्रत्येक परीमाणाच्या मॉनीटरींगकरीता प्रणाली बसविली असून त्यामुळे प्रत्यक्ष साईटवर न जाता संपूर्ण योजनेचे निरिक्षण मोबाईल/कॉम्प्युटरवर करता येते. RMS प्रणालीद्वारे प्रत्येक मिनीटाला किती सौर उर्जा तयार होत आहे, किती विद्युत उर्जेचा वापर होत आहे, पंप किती वाजता सुरु झाला, किती वाजता बंद झाला, पंपाद्वारे पाण्याचा किती विसर्ग होत आहे,
दिवसभरात/मासीक/वार्षिक किती सौर उर्जेचा वापर झाला, किती विद्युत उर्जेचा वापर झाला, दिवसभरात/ मासीक/ वार्षिक किती पाण्याचा विसर्ग झाला इत्यादी माहिती संगणकावर/ मोबाइलवर वेब प्रणालीद्वारे उपलब्ध होवू शकते.
पाणी पुरवठा योजनेत सौर उर्जेचा व रिमोट सेन्सींग प्रणालीचा वापर केल्याने खालीलप्रमाणे फायदे होणार आहेत.
सदर प्रणालीद्वारे संकलीत होणा-या माहितीचा उपयोग धोरणात्मक निर्णय घेणेकरीता उपयोगी ठरू शकेल.
रोजच्या रोज सुक्ष्म निरिक्षण करणे शक्य असल्याने संभाव्य नादुरुस्तीची आगाऊ कल्पना मिळून योजनेची देखभाल दुरुस्ती वेळेत होवून आवश्यक तेवढया कालावधीत पाणी पुरवठा नियंत्रित करणे शक्य आहे.
योजना चालविण्याकरीता होणा-या विद्युत खर्चात वरील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे दरमहा बचत शक्य आहे.
ग्रिड कडून प्राप्त होणारी विज उपलब्ध नसल्यास सौर उर्जेद्वारे पाणी पुरवठा सुरु राहतो.
रिमोट सेन्सींगमुळे प्रत्यक्ष योजनेच्या ठिकाणी न जाता कोणत्याही ठिकाणाहून पंप चालू बंद करणे शक्य असल्याने अतिरिक्त मनुष्यबळाचा भार कमी होईल.
संभाव्य नादुरुस्तीची कल्पना आगाऊ मिळत असल्याने दुरुस्ती खर्चात बचत होणार आहे.
अती पाणी उपस्यावर नियंत्रण येणार आहे.
अशा प्रकारच्या नाविन्यपूर्ण येाजना यूनिसेफच्या आर्थिक सहाय्यातून पुणे जिल्हयात तालुका भोरमध्ये मौजे न्हावी 322, भांबवडे, सांगवी निधान या ठिकाणी प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आल्या आहेत. सदर येाजनेची उपयुक्तता लक्षात घेऊन, जिल्हानिहाय प्रस्ताव मागविण्यात आलेले असून, 27 जिल्हयांमध्ये 64 योजनांची अंदाजपत्रके प्राप्त झालेली आहेत व सदर योजनांच्या अंमलबजावणीसाठी शासनाने मान्यता दिली आहे. अशा प्रकारच्या येाजना राज्यात राबविण्याचे धोरण निश्चित करण्याचा विचार करण्यात येत आहे.
Consultio comes with a beautiful collection of modern, easily importable, and highly customizable demo layouts. Any of which can be installed via one click.