सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्ह्याची भूजल परिस्थिती
मानवी जीवनामध्ये पाण्याच्या गरजेचे अनन्य साधारण मह्त्व आहे. प्रत्येक क्षेत्रात पाण्याची मागणी वाढत आहे.देशातील बहुतांश भागातील शेती मान्सूनच्या पर्जन्यावर अवलंबून आहे. हे पर्जन्यमान वर्षातील 3ते 4महीन्यापुरतेच सीमित आहे. जेव्हा मान्सून पर्जन्यमान कमी प्रमाणात होते, तेव्हा पिकांचे उत्पादन पण कमी होते. शेतीसाठी भूजल हा एकमेव पर्याय उपलब्ध राहत असून,वर्षातील जवळ जवळ आठ महिने भूजल स्त्रोतावर शेती अवलंबून आहे.
जिल्ह्यातील भूपृष्ठीय रचना, पर्जन्यमान तसेच वैशिष्ट्यपूर्ण भूशास्त्रीय रचनेमुळे भूजल संपत्तीच्या उपलब्धतेवर ब-याच मर्यादा आहेत. याशिवाय अधिक पाण्याची गरज असलेली पीक रचना, त्याचप्रमाणे साध्या विहिरी, विंधण विहिरीद्वारे होणा-या जलसिंचन विकासामूळे जिल्ह्यातील काही भागात भूगर्भातील पाण्याची उपलब्धता आणि वापर यामध्ये असमतोल निर्माण होऊन ग्रामीण जनतेला पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही.
प्रस्तावना-
सिंधुदुर्ग जिल्हा सह्याद्री पर्वतरांगाच्या पश्चिमेस वसलेला असून त्याचा विस्तार 15o 37′ ते 16 o 40 उत्तर अक्षांश व 73o 19′ ते 74 o 13′ पूर्व रेखांश यामध्ये दक्षिण उत्तर लांब विस्तारलेला असून एकूण भौगोलिक क्षेत्रफळ 520 चौ.कि.मी. आहे. सन 2011 चे जनगणनेनुसार जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 849651 असून जिल्ह्यामध्ये एकूण 743 गावे आणि 5075 वाड्यांचा समावेश आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र, उत्तरेस रत्नागिरी जिल्हा, पूर्वेस सह्याद्री पर्वतरांगा आणि दक्षिणेस कर्नाटक व गोवा राज्याची हद्द आहे. जिल्ह्याचा कोकण महसूल विभागामध्ये समावेश असून प्रशासकीय दृष्टीने जिल्हा 3 महसूल उपविभागात व 8 तालुक्यामध्ये विभागलेला आहे.
1.कणकवली उपविभागात समाविष्ठ तालुके- देवगड, कणकवली व वैभववाडी
2.कुडाळ उपविभागात समाविष्ठ तालुके – कुडाळ व मालवण
3.सावंतवाडी उपविभागात समाविष्ठ तालुके – सावंतवाडी,वेंगुर्ला व दोडामार्ग
भौगोलिकदृष्ट्या सिंधुदुर्ग जिल्हा पश्चिमेकडून पूर्वेकडे तीन मुख्य विभागामध्ये विभागणी करता येईल. यामध्ये सागरी किना-यालगतचा कमी उतारचा भूभाग, पूर्वेकडील अति उताराचा डोंगराळ भूभाग व या दोन भूभागामधील कमी उतारचा डोंगराळ भूभाग समाविष्ठ आहे. पूर्वेकडील अति उत्ताराचा डोंगराळ भूभाग नदी/ नाल्यांनी व्यापलेला असून त्याची लांबी चाळीस ते पन्नास कि.मी. इतकी आहे. जिल्ह्यातील कमी उतारचा डोंगराळ भूभाग जांभा खडकाने व्यापलेला पठारी भाग असून सह्याद्रीच्या पर्वतरांगामधून उगम पावलेल्या निरनिराळ्या उपनद्यांच्या खो-यांचे प्रदेश निर्माण झालेले आहेत. यामध्ये वाघोटण, देवगड, कर्ली, तेरेखोल सुखशांता, गड, कालावल, अचरा व मोचेमाड या मुख्य पश्चिमेकडे वाहणा-य नद्यांचे व उपनद्यांचे जाळे आहे.
पर्जन्यमान व भूजल उपलब्धता
भूगर्भातील पाण्याचे साठे हे प्रतिवर्षी जलचक्राच्या माध्यमातून पडणा-या पावसाच्या पाण्याच्या जमिनीत मुरणा-या प्रमाणानुसार तयार होतात. यामूळेच पर्जन्यमानाचे स्वरूप भूजल उपलब्धतेसाठी महत्वाचे ठरते. जिल्ह्यात सरासरी पर्जन्यमान 2600 ते 3750 मि.मी. इतके असून जून ते सप्टेंबर या कालावधीत पाऊस पडतो. जिल्ह्यातील पर्जन्यमानाची स्थिती लक्षात घेता प्रत्येक तालुक्यांत पडणारा पाऊसाच्या प्रमाणात विविधता दिसून येते. सरासरी पर्जन्यमानाचे प्रमाण व पर्जन्यमानाचे कालावधीस अनुसरून त्या भागातील मातीच्या आवरणाची जाडी व खडकांच्या स्वभावानुसार पाऊसाचे पाणी जमिनीखाली पुन:र्भरण होऊन भूजलाचे साठे निर्माण होतात. जिल्ह्यातील डोंगराळ भागात बसाल्ट व इतर रूपांतरित खडकातील भेगा व फटीत भूजल उपलब्ध असल्याचे दिसून येते. तसेच जांभा खडकात जलधारण क्षमता खूपच कमी आहे. या भागामध्ये भूजल उपलब्धता हंगामी स्वरूपाचे आहे. अविच्छेदित पठारात समाविष्ठ असलेल्या नदी खो-यातील सपाट भूभागाचा भूजल पुन:र्भरणाची प्रक्रिया जास्त असल्याने या भागात भूजल उपलब्धता जास्त आहे.
भूजलाची उपलब्धता त्याभागातील जलधारक खडकाच्या भूजल वहन क्षमता, जलधारक खडकाची जाडी, भौगोलिक स्थान विहिर/विंधण विहिरीची खोली या मानकांवर अवलंबून आहे. जिल्ह्यात भूजल विहिर व विंधण विहिरीच्या माध्यमातून उपसा करण्यात येत आहे. बहुतांश विहिर/विंधण विहिरींचा घरगुती वापर दिसून येत आहे. जिल्ह्याचे सर्वसाधारण मान्सूनपूर्व स्थिर पाणी पातळी 7.2 मी व मान्सूनत्तोर पूर्व स्थिर पाणी पातळी 3.9 मी इतकी दिसून येत आहे.
अ.क्र | जलधारक खडक | विहिरी | विंधन विहिरी | ||
खोली (m bgl) | क्षमता (m3/day) | खोली (m bgl) | क्षमता (lph) | ||
1 | समुद्रकिनार/खाडीचाभूभाग | 2.00 ते 11.80 | 2 ते 5 | —- | —- |
2 | बेसाल्ट खडक | 8.00 ते 13.50 | 0.5 ते 4 | 45 ते 65 | 500 – 770 |
3 | वालुकामय(कलाडगी) खडक | 3.80 ते 10.00 | 2 ते 5 | 50 ते 60 | 500 – 9315 |
4 | रूपांतरीत खडक | 3.00 ते 11.50 | 2 ते 3 | 50 ते 70 | 500 u 7770 |
भूशास्त्रीय व भूपृष्ठीय रचना
महाराष्ट्र राज्याचा बहुतांश भूभाग बेसाल्ट खडकांनी व्यापलेला असला तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भूभाग बेसाल्ट खडकाशिवाय अतिप्राचीन धारवार आणि कलादगी या रूपांतरित खडकसमूह तसेच वालुकामय आणि जांभा खडकांनी व्यापलेला आहे. यात प्रामुख्याने ग्रॅनाईट, फिलाईट, सेडिमेंटरी क्वार्टझाईट, सँडस्टोन आणि शेल या प्रकरचे खडक आढळून येत आहेत. जांभा खडक किंवा लॅटराईट खडक जिल्ह्यातील डोंगरमाथ्यावरील पठार भागात सर्वसाधारणपणे तीन ते तीस मीटर खोलीपर्यंत आढळून येतात. जांभा खडकाने व्यापलेला भूभाग वगळता उत्तर पूर्वेकडील भूभाग हा बेसाल्ट या कठिण पाषाणाने व्यापलेला आहे. उर्वरित भूभाग धारवार आणि कलादगी सीरीज या नावाने ओळखल्या जाणा-या रूपांतरित खडकांच्या थरांनी व्यापलेला आहे. लॅटराईट खडक बेसाल्ट खडकाचा लिचिंग या रासायनिक प्रक्रियेतून तयार झालेला असून त्या बरोबर काही ठिकाणी बॉक्साईट खनिज आढळून येत आहे. देवगड आणि मालवण तालुक्यांमध्ये हा खडक आढळून येत आहे, तसेच कलादगी सीरीज मालवण व कणकवली तालुक्यांत आढळून येत आहे.
जिल्ह्याच्या दक्षिणेकडील भागात धारवार सीरीज मधील रूपांतरित खडक आढळून येतात. या कठिण पाषाणामध्ये पाणी मुरण्याची व साठविण्याची क्षमता मूळत: अत्यंत कमी प्रमाणात असते. मात्र दीर्घकालीन विघटन प्रक्रियेमूळे पाषाणात, मुरुमात, भेगाफटींत रूपांतर होऊन त्या ठिकाणी भूजल साठा निर्माण होतो. यावरून असे दिसून येते की, कठिण पाषाणाने व्यापलेला (डेक्कन ट्रॅप व रूपांतरित खडक) खडकांच्या संमिश्र (हेटेरोजीनियस) स्वरूपामूळे भूजलाचे अस्तित्व हे विघटित भेगांच्या /सांध्यांच्या खडकापुरते मर्यादित स्वरूपाचे आहे. खडकाचे विघटन हे देखील खडकांच्या प्रकार, भौगोलिक स्थान व त्या भागातील हवामान यावर अवलंबून असते. त्यामुळे गावांच्या परिसरात एक किंवा एकापेक्षा जास्त भूजलदृष्ट्या अनुकूल घटक पावसाचे पाणी साठवण करण्यासाठी उपलब्ध राहू शकतात. त्यामुळे भूजलाचे अस्तित्व मुबलक प्रमाणात व समानतेने उपलब्ध होणे ही खरोखरच नैसर्गिक समस्या आहे. जिल्ह्याचा भूजल साठ्याच्या उपलब्धतेचा विचार करता भूपृष्ठ रचनेचा व त्या भागातील खडकांचा मोठा परिणाम आढळून येतो.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सुदूर संवेदन छायाचित्राच्या अभ्यासावरून असे आढळून येते की, संपूर्ण जिल्हा पाणलोटाच्या वहन क्षेत्रात समाविष्ट असून सुमारे 72% भूभाग हा अतिविच्छेदित व डोंगराळ भूपृष्ठ रचनेने व्यापलेला आहे. यामध्ये विशेष करून जिल्ह्याचा पूर्वेकडील भूभाग व इतर डोंगराळ भूभागाचा समावेश आहे.या भूभागातून पावसाचे पाणी भूपृष्ठावरून अधिक प्रमाणात वाहून जाते. या क्षेत्रात भूगर्भात मुरणा-या पाण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. मध्यम विच्छेदित भूभाग 3.6% असून या पठारी स्वरूपाचा क्षेत्रात भूगर्भात मुरणा-या पाण्याचे प्रमाण मध्यम असून तेथील भूजलाचा वापर हंगामी स्वरूपाचा राहतो. ऊर्वरित 24.3% भूभाग अविच्छेदित पठारात समाविष्ठ असून नदी खो-यातील सपाट भूभागाचा असून या क्षेत्रात भूजल पुन:र्भरणाची प्रक्रिया इतर भूभागाच्या तुलनेत चांगली आहे.
जिल्ह्याची भूशास्त्रीय रचना प्रामुख्याने अति प्राचीन रूपांतरित खडक, वालु खडक व बसाल्ट खडकाने व्यापलेला आहे. जिल्ह्याच्या बहुतांश भागात जांभा खडक व समुद्र किनारी संचयित खडक आढळतो. जिल्ह्यातील खडकांची भूशास्त्रीय कालगणनेनुसार खालील प्रमाणे विभागणी करता येते.
Soil, Laterites, Kankar, etc. – Recent to Sub-recent
Laterites – Pleistocene
Deccan Traps – Cretaceous to Eocene ——————————Unconformityy —————————-
(Conglomerates,, cherty limestones,
Kaladgis — cherty limestones, quartzites and Upper Pre-cambrian
shales associated with limestones)
Archaeans u (Pigmatites and quartz veins,
Basic dykes, Granulites and
Granite gneisses, Hornblende schists, Lower Pre-cambrians
Mafic and Ultra-mafic rocks, Amphibolites,
Banded ferruginous quartzites)
मातीचे आवरण
सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बहुतेक भूपृष्ठभाग हा विघटित खडक व मातीने व्यापलेला असून चढ उताराचा आहे. या विघटित खडकामध्ये भूजल साठवून ठेवण्याची क्षमता खूपच कमी आहे. जिल्ह्यात आढळून येणा-या मातीच्या प्रतीनुसार विभागणी खालील प्रमाणे करण्यात आलेली आहे.
1.लॅटराईट माती – देवगड, कणकवली, मालवण व कुडाळ तालुक्यांमध्ये आढळून
येत आहे.
2.तांबडी माती – वैभववाडी, मालवण, कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला
तालुक्यांमध्ये आढळून येत असून ही माती सुपीक आहे.
3.खारट/खाजण माती- देवगड, मलवण, वेंगुर्ला व सावंतवाडी तालुक्यामध्ये
आढळून येत आहे.
सांस्कृतिक घडामोडी व उत्सव
सिंधुदुर्ग जिल्ह्यात होळी,गणेशचतुर्थी,संक्राती व रक्षा बंधनाचे नियमित उत्सव मोठ्या उत्साहाने पार पाडले जातात. श्रावण महिन्यातील पौर्णिमा नारळी पौर्णिमा म्हणून प्रसिध्द आहे.या दिवशी कोळी बांधव मासेमारी हंगाम सुरु करतेवेळी सागराला नारळ अर्पण करून सागराची पूजा करतात. जिल्ह्यातील आंगणेवाडी भराडीदेवीची व महाशिवरात्रीला श्री कुणकेश्वराची जत्रा या प्रमूख जत्रा म्हणून साज-या केल्या जात आहेत. तसेच दशावतार पौराणिक स्वरूपातील नाटक पहायला मिळते.
पर्यटनस्थळे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील कुणकेश्वर येथे महादेवाचे प्रसिध्द देवस्थान आहे तसेच मालवण तालुक्यात सिंधुदुर्ग हा किल्ला असून या ठिकाणी महाष्ट्रातील एकमेव असे छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर आहे.सावंतवाडी पासून 30किमी अंतरावर सह्याद्री पर्वतराजीत आंबोली हिलस्टेशन नयनरम्य थंड हवेचे ठिकाण आहे.त्याच बरोबर महादेवगड, हिरण्यकेशी नदी उगम,कावळेसाद, नांगरतास, मांगेली असे धबधबे पहायला मिळतात.त्याच बरोबर जिल्ह्यात मनाला भूरळ पाडणारे निसर्गरम्य विलोभनीय असे देवबाग,तारकर्ली शिरोडा,निवती हे सागर किनारे देखील आहेत.