परभणी जिल्हा
जिल्हयाची ठळक वैशिष्टये
- भौगोलीक रचना
परभणी जिल्हा महाराष्ट्राच्या मध्यवर्ती ठिकाणी असुन औरंगाबाद विभागाच्या पुर्वेस आहे. परभणी हा साधु संताचा जिल्हा आहे. पुरातन काळात परभणी शहराला प्रभावती नावाचा अपभ्रंश होवून परभणी नांव प्रचलीत झाले.
परभणी जिल्हा औरंगाबाद विभागाच्या पूर्वेस असून जिल्हयाचे स्थान 18o45’00” व 20o10’00” उत्तरेस अक्षांश व 76o13’00’’ व 77o39’00’’ पूर्व रेखांशावर वसलेला आहे. परभणी जिल्हयाच्या पुर्वेस हिंगोली, पश्चिमेस बीड, उत्तरेस जालना व दक्षिणेस नांदेड जिल्हा येतो. जिल्हयाची पुर्व पश्चिम लांबी 128.72 कि.मी. असून उत्तरदक्षिण रुंदी 104.58 कि.मी. आहे. जिल्हयाचे एकुण क्षेत्रफळ 6511 चौ.कि.मी. असून लोकसंख्या 1835982 लक्ष (2011) (महाराष्ट्रात आठव्या क्रमांकावर) आहे. परभणी जिल्हयामध्ये परभणी, पुर्णा, पालम, गंगाखेड, सोनपेठ, पाथरी, मानवत, सेलू व जिंतुर या 9 तालुक्यांचा समावेश होतो.
जिल्हयात एकुण 852 महसूली गावे व 09 नागरी वस्तींचा समावेश होतो. नागरी भागातील एकुण सन 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या 1.83 लक्ष ऐवढी आहे व ग्रामीण भागातील लोकसंख्या 13.24 लक्ष आहे.
जिल्हयातील गंगाखेड तालुक्यात संत जनाबाई यांचे जन्मस्थ्ळ व मंदिर आहे, जिंतुर तालुक्यात जैन समाजाचे अतिशय क्षेत्र नेमगिरी, परभणी शहरी भागात सय्यद शहा तुराबुल हक दर्गा व पारदेश्वर मंदिर तसेच पाथरी येथील साईबाबांचे मंदिर तथा जन्मस्थान व पालम तालुक्यातील जांभुळबेट हि प्रेक्षणीय स्थळे आहेत. परभणी येथे मराठवाडयातील एकमेव कृषी विद्यापीठ आहे.
परभणी जिल्हयाची ठळक वैशिष्टये :
जिल्हयाचे एकुण क्षेत्रफळ 6251 चौ.कि.मी.
महसूली विभाग 4, परभणी, सेलू, गंगाखेड व पाथरी
तालुके 9 तालुके – परभणी, पुर्णा, पालम, गंगाखेड,
सोनपेठ, पाथरी, मानवत, सेलू व जिंतुर.
लोकसंख्या एकुण 1835982
पुरुष 946185
स्त्रीया 889797
साक्षरता 75.22 %
प्रमुख नद्या गोदावरी, पूर्णा, दूधना, करपरा व मासोळी
प्रमुख उपखोरे गोदावरी, गोदावरीपूर्णा
उपखोरेनिहाय पाणलोट गोदावरी उपखोरे – 12 पाणलोट क्षेत्र
गोदावरी-पूर्णा – 21 पाणलोट क्षेत्र.
सिंचना खालील क्षेत्रफळ 1,85,000 हेक्टर
सिंचन प्रकल्प मोठा 1, मध्यम 2 व लघू 42
मुख्य प्रकल्प पूर्णा – येलदरी
पुर्णा – सिध्देश्वर
प्रशासकीय रचना
परभणी जिल्हयामध्ये 9 तालुके परभणी, पूर्णा, पाथरी, पालम, गंगाखेड, सोनपेठ, सेलू, मानवत व जिंतुर यांचा समावेश होतो.
गावांची संख्या 852
हवामान व पर्जन्यमान :-
परभणी जिल्हयाचे हवामान सर्वसाधारणपणे उष्ण व कोरडे आहे. जून ते ऑक्टोबर या महिन्यात पाऊस असतो. ऑक्टोबर पासुन तापमानात घट होत असून डिसेंबरमध्ये बरीच घट होत असल्याने हवामान थंड असते. याउलट मार्च महिन्याच्या शेवटीपासुन तापमान वाढत जाऊन तापमानाने उच्चांक गाठल्याने उन्हाळा तिव्र जाणवतो. सर्वसाधारण कमाल तापमान 45.6 डि.से. व हिवाळयात किमान तपामान 4.44 डि.सें. ऐवढे असते.
जिल्हयात दक्षिण पश्चिम मान्सुनद्वारे जून ते ऑक्टोबर पाऊस पडत असून हा जिल्हा शाश्वत पर्जन्यमानाच्या क्षेत्रात मोडतो. येथील सरासरी वार्षिक पर्जन्यमान 774.59 मि.मि. व सरासरी पर्जन्यमानाचे 45 दिवस आढळून येतात.
भूशास्त्रीय रचना
परभणी जिल्हयातील उत्तरेकडील जिंतुर तालुक्यात अजिंठा डोंगर रांगा असून दक्षिण-पुर्वेस गंगाखेड व पालम तालुक्यात बालाघाट पर्वतांच्या कमी उंचीच्या डोंगर रांगा आढळून येतात. संपूर्ण जिल्हा हा बेसाल्ट या अग्निजन्य खडकांनी व्यापलेला आहे. जिल्हयाच्या उत्तर व दक्षिण-पूर्वेस मॅसिव्ह बेसाल्टचे प्रमाण जास्त असुन इतरत्र व्हेसीक्युलार तथा झिओलेटीक बेसाल्टचे प्रस्तर आढळून येतात. तसेच गोदावरी, पूर्णा, दुधना या मुख्य नद्यांच्या क्षेत्रात गाळांचा थर आढळून येतो. बेसाल्ट खडकांच्या विघटनामूळे तयार झालेला विघटीत बेसाल्ट व त्यामध्ये आढळणाऱ्या सांधे व भेगायुक्त खडक हा मुख्य जलधारक खडक आहे.
भुजल शास्त्रीय माहिती
परभणी जिल्हयाची 33 पाणलोट क्षेत्रात विभागणी करण्यात आली असुन ती पाणलोट क्षेत्र गोदावरी, पुर्णा नदीच्या उपखोऱ्यात मोडतात. गोदावरी उपखोऱ्यात 12 पाणलोट क्षेत्र असुन गोदावरी-पूर्णा नदीच्या उपखोऱ्यात 21 पाणलोट क्षेत्र येतात.भूपृष्ठीय रचनेच्या आधारावर पाणलोट क्षेत्रांचे डोंगराळ क्षेत्र (Run off zone) पुनर्भरण क्षेत्र (Recharge zone) व संचयन क्षेत्र (Storage zone) असे भाग करण्यात आलेले आहेत.
पाणलोट क्षेत्र व भूजल मुल्यांकन
सन 2011-12 मध्ये सातव्या भूजल मुल्यांकनानूसार परभणी जिल्हा हा सुरक्षित पाणलोट क्षेत्राच्या वर्गवारीत मोडतो. त्यानुसर जिल्हयांत एकूण 34413 सिंचन विहिरी घेण्यात आल्या आहेत.
- जिल्हयातील एकूण उपलब्ध पाणी 60 हे.मि.
- पिण्याच्या तथा सिंचनासाठीच्या पाण्याचा होणारा एकूण उपसा 27 हे.मि.
- जिल्हयातील एकूण शिल्लक पाणी 74 हे.मि.
- नव्याने होऊ शकणाऱ्या सिंचन विहिरींची संख्या 40776
भौगोलीक परिस्थितीनुसार जिल्हयाचे 33 पाणलोटक्षेत्रात वर्गीकरण करण्यात आले आहे. पाणलोट क्षेत्रात पडलेल्या पर्जन्यमानानुसार व भौगोलीक परिस्थितीनुसार भूजलाचे पून:र्भरण होत असते. भूजल-संचय हा भूजलाच्या पातळीमध्ये झालेल्या वाढीद्वारे दिसतो. पावसाळयानंतर भूजलाच्या वापरानूसार हा भूजल-संचय कमी होतो व परिणामत: पाण्याच्या पातळीत घट होते. भूजल-संचयामध्ये होणारी वाढ किंवा घट भूजल पातळीच्या नोंदीनुसार ठरविता येते. हा अंदाज घेण्यासाठी भौगोलीक परिस्थिती नुसार पाणलोटक्षेत्र हा प्रमुख घटक धरण्यात आला आहे.
मृदा प्रकार :
जिल्हयाचा बहुतांश भाग हा काळया मातीने आच्छादलेला आहे. अशी मृदा शेतीच्या उत्पन्नाच्या दृष्टीने अधिक उपयोगी आहे. जिल्हयातील 93 टक्के भाग हा बेसाल्ट या अग्निजन्य खडकांनी व्यापलेला आहे, उर्वरीत 7 टक्के भाग गाळाच्या थरांनी व्यापलेला असुन त्यामध्ये गोदावरी व पूर्णा नदीच्या परिसरातील भागाचा समावेश होतो. तसेच गाळाच्या प्रदेशातील वालूकामय पटयातही भूजलसाठा आढळतो. त्यात जलधारक प्रस्तराची भूजलधारक व भूजलवहन क्षमता परिस्थितीनुरुप बदलते. उत्तरेकडील भाग हा कमी गाळाचा व जमीनीची प्रत खराब आहे. तर दक्षिणेकडील भाग हा जास्त गाळाचा व जमिनीची प्रत पिकांच्या दृष्टीने योग्य आहे.
सिंचन प्रकल्प
परभणी जिल्हयातील बृहत योजनेनुसार एकूण प्रकल्प
सिंचन प्रकल्प | संख्या | एकूण जलसाठा |
मोठे | 01 | 861.864 दलघमी |
मध्यम प्रकल्प | 02 | 35.42 दलघमी |
लघु प्रकल्प | 23 | हे.मी. |
एकुण सिंचन विहिरींची संख्या 40776 विहिरी
एकुण विहिरीद्वारे सिंचन क्षेत्र 51619 हेक्टर
परभणी जिल्हयात कृत्रीम पुनर्भरणाची गरज निर्माण होण्यास येथील भूपृष्ठीय व भूशास्त्रीय जडणघडण कारणीभूत आहे. जिल्हयामध्ये सरासरी पर्जन्यमान 774.59 मि.मि. आहे. जिल्हयातील पूर्वउत्त्र व दक्षिण पश्चिमेकडील भाग हा अजिंठा व बालाघाटच्या डोंगररांगानी व्यापला आहे. या डोंगर रांगातुन उगम पावणारे ओढे पूढे करपरा, दूधना, पूर्णा नदीस मिळून शेवटी गोदावरी नदीस मिळतात. दुधना व गोदावरी नद्यांच्या गाळांमुळे त्यांच्या काठावरील गावांमध्ये काळया मातीचा सुपीक प्रदेश तयार झालेला आहे. या काळया मातीत भूजल पूनर्भरणाचा नैसर्गीक वेग अत्यंत कमी असतो व डोंगराळ तथा इतर उंच सखल भागातुन भूजलाचा निचरा जमिनीखालुन वेगाने होतो. त्यामुळे उन्हाळयात पाणी टंचाई निर्माण होते.
पाणी टंचाईवर मात करण्यासाठी स्त्रोत बळकटीकरणाच्या ॲक्वीफर रिचार्ज शाफट सिस्टिम, रिचार्ज ट्रेंच व एफएससी (जलरोध भिंत) यासारख्या अपारंपारीक उपाययोजना राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम व जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत प्राप्त निधीमधुन राबविण्यात आल्या.