ठाणे / पालघर जिल्हा
ठाणे जिल्हा माहिती
प्रस्तावना-
ठाणे जिल्हा कोकणचा उत्तर भाग असून तो पूर्वेकडे असणा-या सहयाद्रीच्या रांगा व पश्चिमेकडील अरबी समुद्राच्या किनारपट्टीच्या दरम्यान पसरला आहे. जिल्ह्याला 113 कि.मी. चा समुद्र किनारा आहे. जिल्हयाचे भौगोलिक स्थान 72.45 आणि 73.48 पूर्व रेखांश व 18.42 आणि 20.20 उत्तर अक्षांश मध्ये येते. दक्षिण पूर्वेकडील पसरलेला जिल्ह्याचा पूर्व-पश्चिम भाग हा 100 किमी असून उत्तर-दक्षिण 140 किमी आहे.
जिल्ह्यात एकूण 7 तालुके आहेत. यापैकी शहापूर तालुका आदिवासी क्षेत्रात येतो. मुरबाड व भिवंडी तालुके आदिवासी तसेच बिगर आदिवासी क्षेत्रात येतात. उर्वरीत चार तालुके अंबरनाथ, कल्याण, उल्हासनगर व ठाणे पुर्णपणे बिगर आदिवासी क्षेत्रात येतात.
भौगोलिक क्षेत्र
2011 च्या जनगणनेनुसार विभाजीत जिल्हयाचे क्षेत्रफळ 4214 चौ.कि.मी. असून राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या 1.37 टक्के आहे. क्षेत्रफळाचा विचार केला तर राज्यात जिल्हयाचा 33 वा क्रमांक लागतो. जिल्हयातील 7 तालुक्यापैकी शहापूर तालुक्याचे क्षेत्रफळ सर्वात जास्त असून ते 1629 चौ.कि.मी. (38.66 टक्के) तर सर्वात लहान उल्हासनगर तालुका 13 चौ.कि.मी. (0.31 टक्के) क्षेत्रफळाचा आहे. जिल्हयातील ठाणे व उल्हासनगर हे दोन तालुके पूर्णपणे शहरी आहेत. या दोन तालुक्यासह कल्याण, भिवंडी व अंबरनाथ हे तालुके तुलनात्मकदृष्टया विकसित आहेत.
ऐतिहासिक पार्श्वभूमी-
ठाणे हे अतिशय जुने शहर आहे. ह्या शहराचे उल्लेख मध्ययुगीन काळातील शिलालेखात आणि ताम्रपटात सापडतात. हे शहर शिलाहार राजांची राजधानी होती. भारताच्या पहिली रेल्वे बोरीबंदर (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस), मुंबई ते ठाणे दरम्यान 1853 मध्ये धावली.
औद्योगिक स्थिती-
ठाणे हा महाराष्ट्र राज्यातील काही औद्योगिकदृष्ट्या प्रगत जिल्ह्यांपैकी एक आहे. औद्योगिक विकासाच्या बाबतीत ठाणे जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्याच्या अर्ध्याहून अधिक भागाचा आर्थिक आणि सामाजिक विकास औद्योगिकीकरणामुळे झाला आहे. महाराष्ट्रात इचलकरंजीनंतर भिवंडीचा कापड उद्योग त्याच्या कापड उद्योगासाठी ओळखला जातो. केंद्र सरकार पुरस्कृत दारूगोळा आणि शस्त्रास्त्र निर्मिती कारखाना अंबरनाथ येथे आहे. जिल्ह्यात खनिज उत्पादन फारसे नसले तरी, मुंब्रा, ठाणे आणि घोडबंदर येथे बांधकामासाठी वाळू उत्खननाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो.
भौगोलिक रचना
जिल्ह्याला त्याच्या भौगोलिक रचनेच्या आधारे तीन भागांत विभागले आहे.
- डोंगराळ प्रदेश- शहापूर, मुरबाड, भिवंडी तालुक्यातील पुर्वेकडील भाग
- मध्यम उताराचा पठारी प्रदेश- अंबरनाथ, उल्हासनगर तालुक्यातील भाग
- किनारपट्टीचा प्रदेश- कल्याण, भिवंडी, ठाणे तालुक्यातील पश्चिमेकडील भाग
नदी नाले जाळे व पाणलोट क्षेत्रे-
प्रवाह संरचना- जिल्ह्यातील नद्या पश्चिमवाहिनी असून उल्हास हि प्रमुख नदी आहे. काळू नदी सह्याद्री रांगांतील माळशेज- पुणे येथे उगम पावून जिल्ह्यातील मुरबाड, कल्याण तालुक्यातून वाहत कल्याण खाडीतून अरबी समुद्रास मिळते. तानसा, भातसा, बारवी या तिच्या मुख्य उपनद्या आहेत.
ठाणे जिल्ह्यात एकूण 16 पाणलोट क्षेत्र असून त्याची वर्गवारी सुरक्षित आहे.
पर्वत रांगा
पूर्वेकडे असणा-या सहयाद्रीच्या रांगा सह्याद्रीच्या सीमारेषेवर सीमारेषा उभ्या आहेत. तसेच छोट्या छोट्या पर्वत रांगा विखुरलेला भूभाग आहे. पूर्वेकडे पर्वत रांगा ऊंच-ऊंच असून पश्चिमकडे हळूहळू कमी-कमी होतात. जिल्ह्याच्या मध्यवर्ती भागातसुध्दा छोट्या पर्वतरांगा पसरले आहेत.
हवामान
जिल्ह्याचे हवामान सर्वसााधारणपणे सम आहे. तथापि ते सागर किनारी व किनारपट्टीच्या नजीक उष्ण व दमट आहे. किनारपट्टीतील ठाणे, तालुक्यात हवामान उष्ण आहे. याउलट पुर्वेकडील सह्याद्री पर्वताच्या उतरणीला पायथ्याच्या सपाटी प्रदेशातील हवामान कमी उष्ण आहे. सर्वसाधारणपणे जानेवारी व फेब्रुवारी या महिन्यात हवा थंड असते.
पर्जन्यमान
ठाणे जिल्ह्याचा कोकणपट्टीतील अतिपर्जन्य प्रदेशामध्ये समावेश आहे. जिल्ह्यात नैऋत्य मान्सून या वाऱ्यापासून मुख्यत: पाऊस पडतो. जिल्ह्याचा वार्षिक सरासरी पर्जन्यमान 2516.06 मि.मी. आहे.
भूशास्त्रीय रचना
जिल्ह्याची भूशास्त्रीय रचनेतील स्ट्रेटिग्राफिक क्रमरचना खालील चार भागात वर्गीकृत आहे.
निर्मिती कालखंड भूरचना
ॲल्युव्हियम अलिकडील कालखंड (Recent) गाळ, चिकनमाती, वाळू
किनारी वाळू अलिकडील कालखंड गाळ, वाळू
जांभा खडक प्लीओस्टोसीन कालखंड (Pleistocene) जांभा
शैलभिंती (Dykes) – – – मुलभूत अंतर्वेधन
दख्खनचे पठार खालचा इओसिन (Lower Eocene) ते बेसाल्ट
वरचा इओसिन (Upper Eocene)
भूजलशास्त्रीय रचना
भूजलशास्त्रीयदृष्टया बेसाल्ट खडकाची जलधारणा क्षमता ही झीज झालेला, सांधे असलेला, तुकडे झालेल्या खडकामध्ये आढळून येते. दख्ख्नच्या पठारामध्ये भूजल उपलब्धता हि खडक झीज प्रमाण, खडकामधील सांध्यांची उपलब्धता आणि खडकाची सछिद्रता व वहनक्षमता या घटकांवर अवलंबून आहे. भूजलाची साठवण व वहन क्षमता हि मुख्यत्वेकरून संबंधीत भूप्रदेशाच्या भौतिक व भूरूपशास्त्रीय रचनेवर अवलंबून असते. जिल्हयातील भूपृष्ठीय उतार हा मध्यम ते तीव्र स्वरूपाचा असल्यामुळे तसेच विशिष्ट प्रकारच्या भूरूपशास्त्रीय रचनेमुळे भूजल साठवण क्षमतेत मर्यादा असून हे भूजल साठे मुख्यत्वे मैदान आणि दरी प्रदेशात आढळतात.
पालघर जिल्हा माहिती
प्रस्तावना –
ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन १ ऑगस्ट २०१४ पासून नव्याने पालघर हा राज्यातील ३६वा जिल्हा अस्तित्वात आला. कोकणच्या उत्तर भागास असलेला पालघर जिल्हा पुर्वेकडे असणा-या सहयाद्री पर्वत रांगा व पश्चिमेकडील अरबी समुद्राच्या किनारपट्टी दरम्यान पसरला आहे. जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्रफळ सुमारे 4696.99 चौ.कि.मी. असून सन 2011 च्या जनगननेनुसार जिल्हाची एकूण लोकसंख्या २९,९०,११६ एवढी आहे. जिल्हयाचे स्थान 19017’15” ते 20013’45” उत्तर अक्षांश आणि 72038’35” ते 73030’25” पूर्व रेखांश असे आहे. पालघर जिल्ह्यात जव्हार, मोखाडा, तलासरी, वसई, विक्रमगड, पालघर, डहाणू आणि वाडा असे एकूण ८ तालुके असून जिल्हा मुख्यालय पालघर येथे स्थित आहे. जिल्ह्याचे एकुण पाच प्रशासकीय विभाग पाडण्यात आले असुन त्यामध्ये एकूण 477 ग्रामपंचायतीमध्ये 1008 गावे व 3818 पाडयांचा समावेश आहे. यापैकी बहुतांश क्षेत्र आदिवासी बहुल आहे. जिल्हयाच्या सीमा पश्चिमेस अरबी समुद्र, उत्तरेस गुजरात राज्य, उत्तर पूर्वेस नाशिक, दक्षिण पूर्वेस ठाणे व दक्षिणेस मुंबई उपनगर जिल्हाने बंदिस्त आहेत.
जिल्हयातील ग्रामीण भागामध्ये आदिवासी लोकवस्ती आढळून येते. पठारी व डोंगराळ भागामध्ये मुख्य व्यवसाय शेती असून जंगलातील लाकुडफाटा गोळा करणे, जंगलातील मध , लाख व औषधी वनस्पती इत्यादी गौण उत्पादने गोळा करणे हा देखिल व्यवसायाचा एक भाग आहे. किनारपट्टीच्या भागामध्ये मासेमारी हा प्रमुख व्यवसाय असून चिकू, आंबा, नारळ, पानवेली इ. बागायती शेती आढळून येते.
सांस्कृतिक वारसा –
आदिवासींमध्ये प्रामुख्याने वारली, कातकरी, मल्हार, कोळी इत्यादी जमाती आहेत. आदिवासी समाजाने आपला सांस्कृतिक वारसा जपला असून त्यामधील वारली चित्रकला व तारपा नृत्य हि त्यांच्या समाजजीवनाची ओळख आहे.
ऐतिहासिक पार्श्वभूमी–
पालघर जिल्हयातील वसई या शहरास पेशवेकालीन इतिहास असून 350 वर्षापूर्वी चिमाजी अप्पांच्या पराक्रमाने पोतुर्गीजांचे साम्राज्यास सुरुंग लावला आहे.
याचप्रमाणे स्वातंत्रयलढयामध्ये 1930 चा मिठाचा सत्याग्रहामध्ये पालघर तालुक्यातील कार्यकर्ते सहभागी होते. चलेजाव आंदोलनामध्ये पालघर तालुक्यात १४ ऑगस्ट १९४२ रोजीच्या उठावामध्ये पाच हुतात्मा शहीद झाले होते. जव्हार येथे मुकणे संस्थानाचा प्रसिद्ध राजवाडा आजही इतिहासाची साक्ष देत आहे.
औद्योगिक स्थिती –
पालघर जिल्हा मुंबई व ठाणे पासून जवळ असून पश्चिम रेल्वेमार्गाने जोडला गेला आहे. जिल्हयातील पालघर, वसई, वाडा येथील नागरी भागामध्ये औद्योगिक क्षेत्र आहे. यामधील तारापूर, तालुका पालघर येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने विकसीत केलेल्या क्षेत्रामध्ये मोठे, मध्यम व लघुउद्योग मोठया प्रमाणात आहेत. यासह ३ शासकीय सहकारी औद्योगिक वसाहती पालघर, वसई व वाडा येथे अस्तित्वात आहेत.
या औद्योगिक वसाहतींमध्ये कापड उद्योग, रासायनिक कारखाने, अभियांत्रिकी उद्योग, स्टील उद्योग मोठया प्रमाणात आहेत.
भूस्तररचना –
भूस्तररचनेनुसार जिल्हयाचे मुख्य तीन विभागांमध्ये वर्गीकरण करता येते.
- डोंगराळ प्रदेश- जव्हार,मोखाडा; वाडा तालुक्यातील पूर्वेकडील भाग
- मध्यम उताराचा पठारी प्रदेश विक्रमगड, तलासरी तालुक्यातील भाग
- किनारपटटीचा प्रदेश वसई, पालघर, डहाणू तालुक्यातील पश्चिमेकडील भाग
प्रवाह संरचना –
जिल्हयातील नदया पश्चिमवाहिनी असून वैतरणा हि प्रमुख नदी आहे. वैतरणा नदी सहयाद्री रांगातील त्रंबकेश्वर येथे उगम पावून जिल्हयातील वाडा, पालघर तालुक्यातून वाहत जाऊन वसई खाडीतून अरबी समुद्रास मिळते. पिंजाळ, सुर्या, देहर्जे आणि तानसा या तिच्या मुख्य उपनद्या आहेत.
हवामान व पर्जन्यमान –
जिल्हयाचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान 2458 मि.मी असून मुख्यत: नैऋत्य मोसमी वा-यामुळे जून ते सप्टेंबर या कालावधीत पाऊस पडतो. जिल्हयातील हवामान हे मुख्यत्वे उष्ण व दमट आहे. जिल्हयाचे सरासरी तापमानातील तफावत 8 ° से. ते 40° से. इतकी आहे.
मृदा प्रकार –
जिल्हयात समाविष्ट भूप्रदेशातील पृष्ठभागामध्ये मुख्यत्वे चार प्रकारची माती आढळून येते.
- जाडी – भरड माती – या प्रकारची माती डोंगरमाथ्यावर आढळते.
- मध्यम आकाराची काळपट – या प्रकारची माती जिल्हयाच्या पूर्वेकउील डोंगर उतारावर करडया रंगाची माती आढळते.
- काळी माती – या प्रकारची माती वैतरणा व तिच्या उपनदयांच्या किनारी भागात आढळते.
- समुद्रकिना-यावरील खारपट – या प्रकारची माती जिल्हयाच्या पश्चिमेला समुद्रकिनार माती पटटयात आढळते.
भूशास्त्रीय रचना –
जिल्हयाचा बहुतांश भूभाग बेसाल्ट या अग्निजन्य खडकाने व्यापलेला आहे. यालाच दख्ख्नचे पठार म्हणतात. बेसाल्ट या खडकाची निर्मिती ही मुख्यत्वे ज्वालामुखीद्वारे खालचा इओसिन (Lower Eocene) ते वरचा क्रिटेसियस (Upper Cretaceous) या कालखंडात झाली आहे. बेसाल्ट खडकाव्यतिरिक्त ॲल्यूव्हियम (Alluvium), समुद्रककाठची रेती, जांभा खडक कमी अधिक प्रमाणात आढळतात. लाव्हारसाचे विशिष्ट प्रकारचे संचयनामुळे सपाट टेकडी प्रदेश व रांगारांगाचा डोंगर उताराची भूरूपशास्त्रीय रचना आढळून येते.
जिल्हयाच्या भूशास्त्रीय रचनेतील स्ट्रेटिग्राफिक क्रमरचना खालील चार भागात वर्गीकृत आहे.
निर्मिती कालखंड भूरचना
ॲल्युव्हियम अलिकडील कालखंड (Recent) गाळ, चिकणमाती, वाळू
किनारी वाळू अलिकडील कालखंड गाळ, वाळू
जांभा खडक प्लीओस्टोसीन कालखंड (Pleistocene) जांभा
शैलभिंती (Dykes) —- मुलभूत अंतर्वेधन
दख्ख्नचे पठार खालचा इओसिन (Lower Eocene) ते बेसाल्ट
वरचा क्रिटेसियस (Upper Cretaceous)
भूजलशास्त्रीय रचना –
भूजलशास्त्रीयदृष्टया बेसाल्ट खडकाची जलधारणा क्षमता ही झीज झालेला, सांधे असलेला, तुकडे झालेल्या खडकामध्ये आढळून येते. दख्ख्नच्या पठारामध्ये भूजल उपलब्धता हि खडक झीज प्रमाण, खडकामधील सांध्यांची उपलब्धता आणि खडकाची सछिद्रता व वहनक्षमता यां घटकांवर अवलंबून आहे. भूजलाची साठवण व वहन क्षमता हि मुख्यत्वेकरून संबंधीत भूप्रदेशाच्या भौतिक व भूरूपशास्त्रीय रचनेवर अवलंबून असते. जिल्हयातील भूपृष्ठीय उतार हा मध्यम ते तीव्र स्वरूपाचा असल्यामुळे तसेच विशिष्ट प्रकारच्या भूरूपशास्त्रीय रचनेमुळे भूजल साठवण क्षमतेत मर्यादा असून हे भूजल साठे मुख्यत्वे मैदान आणि दरी प्रदेशात आढळतात. समुद्रकिनारी प्रदेशामध्ये भूजल साठे विस्तृतप्रमाणात आढळतात. तथापि या भूजलाचा जास्त प्रमाणात उपसा झाल्यास भूजल साठयांमध्ये समुद्रातील खारेपाण्याचा शिरकाव होण्याचा संभव असतो. तसेच किनारी भागातील खोलीवरील पाणी साठे मचूळ स्वरूपाचे आहेत. भूजलावर आधारित जलसिंचनाचा डहाणू, तलासरी, वसई आणि पालघर तालुक्यांमध्ये विशेषत: किनारी भागातील फळबागायतीसाठी वापर होतो.
पालघर जिल्हयामध्ये एकूण 23 पाणलोट क्षेत्र आहेत. स्थिर भूजल पाणी पातळी अभ्यासाकरिता जलविज्ञान प्रकल्पांतर्गत एकूण 55 निरिक्षण विहिरींची निवड करण्यात आली असून वर्षातून चार वेळा पाणी पातळीच्या नोंदी घेतल्या जातात. निरिक्षण विहिरीतील स्थिर भूजल पाणी पातळी माहितीचा आधार भूजल मूल्यांकन, संभाव्य पाणी टंचाई अहवाल व भविष्यातील भूजल विकास वेध यामध्ये घेतला जातो.
भूरूपशास्त्रीय रचनेनुसार भूजल पाणी पातळीतील फरकामध्ये विविधता आढळून येते. जिल्याच्या पशिचमेकडील किनारी भागामध्ये सरासरी भूजल पाणी पातळी 1.00 मी. ते 4.00 असून डोंगराळ भागातील सरासरी भूजल पाणी पातळी 2.00 ते 7.00 मी. इतकी आहे.
गरम पाण्याचे झरे –
वसई आणि पालघर तालुक्यात गरम पाण्याचे झरे आढळतात. त्यामध्ये मुख्यत्वे सातिवली,हालोली व कोंकणेरे या गावांचा सामावेश होतो. झ-याच्या पाण्याचे तापमान हे 300C ते 700C दरम्यान असते.