जिल्हा – वर्धा
- प्रस्तावना :-
महाराष्ट्राच्या ईशान्य कोपऱ्यात वर्धा नदीची पश्चिम दक्षिण सीमा निश्चित केल्या असल्यामुळे नदीच्या नावावरुन ब्रिटीशांनी या जिल्हयास वर्धा हे नाव दिलेले आहे.
जिल्हा उत्तर अक्षांश 200-8’ ते 210-22’ आणि पुर्व रेखांश 780-4’ व 790-15’ या मध्ये पसरलेला असून भारतीय सर्वेक्षण विभागाच्या 55 के, एल, पी, डिग्री शीटमध्ये समाविष्ट आहे. पुर्वेस नागपूर जिल्हयाचे काटोल, नरखेड, नागपूर ग्रामीण हिंगणा, भिवापूर, उमरेड, तालुके आग्नेयस चंद्रपूर जिल्हयाचा वरोरा तालुका, दक्षिणेस व नैऋत्येस यवतमाळ जिल्हयाचे कळंब राळेगाव व मारेगाव तालुके आणि पश्चिमेस व उत्तरेस अमरावती जिल्हयाचे चांदुर रेल्वे, तिवसा, मोर्शी व वरुड तालुके आहेत.
वर्धा जिल्हयाचे क्षेत्रफळ 6310 चौरस किलोमीटर असून लांबी 158 कि.मी. व रुंदी 58 कि.मी. आहे. जिल्हयाचे सरासरी पर्जन्यमान 958-1100 मी.मी. आहे. वर्धा जिल्हयाचे मुख्यालय वर्धा असून प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने हया जिल्हयाचे वर्धा, सेलु, देवळी, हिंगणघाट, समुद्रपूर, आर्वी, आष्टी व कारंजा अशा आठ तालुक्यात विभाजन करण्यात आलेले आहे. त्यात 6 नगरपालिका समाविष्ठ आहेत.
- इतिहास
वर्धा जिल्हयाचा इतिहास फार जुना आहे. केळझर येथील भोसले कालीन तलाव व मंदिर बघण्यासारखे आहे. वर्धा जिल्हयात सेवाग्राम येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा आश्रम व पवनार येथे आचार्य विनोभा भावे यांचा आश्रम हे मुख्य आकर्षण केंद्रे आहेत.
- भौगोलिक परिस्थिती
प्राकृतिक दृष्टया वर्धा जिल्हयाचे दोन नैसर्गिक विभाग पडतात, उत्तरेकडील व ईशान्येकडील डोंगराळ प्रदेशात प्रामुख्याने सातपुडा पर्वताच्या दक्षिणेकडे व आग्नेयकडे पसरलेल्या डोंगर रांगाचा समावेश होतो. दक्षिणेकडील मैदानी प्रदेश वर्धा नदीच्या रुंद खोऱ्याचा प्रदेश असून येथे अनेक लहान मोठे डोंगर सर्वत्र पसरलेले आढळतात.
उत्तरेकडील प्रदेशाची सरासरी ऊंची 450 मी. व दक्षिणेकडील प्रदेशाची ऊंची 250 मी. आहे. उत्तरेकडील प्रदेश तीव्र उताराचा तर दक्षिणेकडील भाग सौम्य उताराचा आहे.
संपुर्ण वर्धा जिल्हयाचा प्रदेश वर्धा नदीच्या खोऱ्यात वसलेला असून वर्धा व तिची मुख्य उपनदी वेणा या प्रदेशातुन वाहते. जिल्हयातील सर्व नद्या विविध डोंगर माथ्यावर व उत्तरेकडील सातपुडा पर्वताच्या रावणदेव-गरमसुर टेकडया, नांदगाव टेकडया व ब्राम्हणवाडा टेकडयावर उगम पावतात. वर्धा व वेणाचा काही भाग वगळता सर्वच नद्या हंगामी स्वरुपात आहेत.
मुख्य नदी :- वर्धा नदी
उपनदया :- वेणा, यशोदा, बाकळी, जाम, कार, पोथरा, लई, नांद, बोर व धाम.
वर्धा आणि वेणा नद्यांच्या डाव्या किनाऱ्यांची ऊंची उजव्या किनाऱ्यापेक्षा कमी असल्यामुळे डाव्या किनाऱ्यांच्या भागात पावसाळयांत पुराचे पाणी सहजपणे पसरते. वर्धा, सेलू, देवळी, हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यातील नद्यांचा प्रवाह आकृतिबंध वृक्षाकार (Dendritic) स्वरुपाचा आहे, तर उत्तरेकडील आष्टी, कारंजा, आर्वी तालुक्यातील आकृतीबंध समांतर (Parallel) किंवा सहसमांतर (Subparallel) स्वरुपाचा आहे. याचे मुख्य कारण म्हणजे उत्तरेकडील नद्यांच्या प्रवाह मार्गावर असलेले बेसाल्टमधील जोड पातळयांचे (Joints planes) नियंत्रण होय. त्यामुळे उत्तरेकडील बऱ्याचशा नद्या मुख्य नदीला समांतर अशा उत्तर-दक्षिण दिशेने वाहतात.
- सिंचन प्रकल्प
वर्धा जिल्हयात एक मोठा सिंचन प्रकल्प (बोरधरण), तीन मध्यम प्रकल्प (पंचधारा, डोंगरगाव व पोथरा) व 91 लघू प्रकल्प, 8 उपसा सिंचन योजना, 166 कोल्हापूरी बंधारे आहे.
- जिल्हयातील ठळक वैशिष्टये :-
2.1 क्षेत्रफळ 6310 चौरस कि.मी.
लांबी 158 कि.मी.
रुंदी 58 कि.मी.
तालुके – 8
शहरे – 6
खेडी – 967 वस्ती असलेली
लोकसंख्या- 10,65,589
412 निर्जन
2.2 पर्जन्यमान 985-1100 मी.मी.
तापमान उन्हाळा 42.8 महत्तम 28.4 लघुत्तम
तापमान हिवाळा 28.7 महत्तम 12.1 लघुत्तम
2.3 भूजलशास्त्रीय विवरण
जलधारक खडक बेसाल्ट – जाळाचा प्रदेश
पाण्याची भूजल पातळी जमीनी खालील
उन्हाळा 2.88 मी.ते 15.4 मी.
हिवाळा 1.05 मी. ते 12.0 मी.
2.4 भूस्तर निहाय विहीरींची क्षमता
झिजलेल व भेगायुक्त खडक 13.50 ते 68.00 कि.ली./दिवस
सच्छिद्र बेसॉल्ट 28.00 ते 90.00 कि.ली./दिवस
(Vessicular Basalt)
गाळाचा प्रदेश 68.00 ते 260.00 कि.ली./दिवस
2.5 हायड्रोकेमेस्ट्री
बेसाल्ट आणि जाळीय प्रस्तरांपासून मिळणारे पाणी शेतीसाठी आणि पिण्यासाठी योग्य आहे.
2.6 सन 2023-24 चे भूजल मुल्यांकनाची माहिती :-
- भूजलाचे एकुण पुनर्भरण 89620.45 हे.मी.
- भूजलाची एकुण उपसा 47015.36 हे.मी.
- भूजलाची एकुण शिल्लक 42605.09 हे.मी.
- अतिविकसीत / विकसित/ शोषित पाणलोट क्षेत्र निरंक
- अंशत: शोषित पाणलोट क्षेत्र 1
सन 2023-24 चे भूजल मुल्यांकन करण्यात आलेले असून सदर अहवाल मा.आयुक्त, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे यांना सादर करण्यात आलेले आहे. सातव्या भूजल मुल्यांकनानूसार जिल्हयात एकुण 39 पाणलोट आहेत, त्यापैकी 38 पाणलोट क्षेत्र सुरक्षित वर्गवारीत व 1 पाणलोट क्षेत्र अंशत: शोषित वर्गवारीत येत आहे.
- भूशास्त्र :-
मध्यक्रिटेशिअस कालीन लॅमेटा चुनखडी व शेल काही ठिकाणी अल्प प्रमाणांत आढळतात. त्यावर अप्पर क्रिटेशिअस ते लोअर ईओसीन कालीन डेक्कन ट्रॅप, मुख्यत्वे करुन बेसाल्ट या ज्वालामुखी खडकाचे थर आहेत. काही ठिकाणी बेसाल्टच्या थरा मधील इंटरट्रॅपीयन खडक उघडे पडलेले आढळतात. बेसाल्ट खडकावर काही ठिकाणी सबरिसेंट जांभा लॅटराइट खडक अगदी क्वचित आढळतो. मात्र या काळातील गाळ वर्धा नदी आणि तिच्या प्रमुख उपनद्या मध्ये पसरलेला आढळतो.
भूशास्त्रीय रचना (Geology of the District)
काळ | भूशास्त्रीय रचना | खडकांचा प्रकार |
सबरिसेंट ते रिसेंट | ॲल्यूव्हीयम सॉईल | सॅन्ड, सिल्ट, क्ले, चुनखडी मिश्रीत खडक |
अप्पर क्रिटेशियस- लोअर इवोसिन | डेक्कन ट्रॅप | सछिद्र खडक (बेसाल्ट) कठीण भेगाचा बेसॉल्ट इंटरट्रॅपियन बेड त्यात लाल आणि हिरवे मातीचे थर चर्ट आणि चुनखडीचा खडक |
मीडल क्रिटेशियस | इन्फ्राट्रॅपीयन बेड | क्ले, चुनखडीचा खडक, बाळूचा खडक. |
- भूजल विषयक सर्वसाधारण माहिती :-
डेक्कन ट्रॅप बेसाल्ट खडकात भूजल झिरपणे व संचयन करण्याची क्षमता अत्यंत कमी आहे. भूजलाचे झिरपणे त्याच्या भूमिगत हालचाली प्रामुख्याने बेसाल्टमधील संधीची, भेगांची, रुंदी त्याची खोली, विपूलता (संख्या) अपेक्षीत खडकाची जाडी, बेसॉल्टचा प्रकार इत्यादीवर अवलंबुन असतात. सुटी वाळू व खडी यांच्यामुळे अवसादी पटटयात पाण्याचे प्रमाण अगदी भरपूर असते हे पाणी भूजल पृष्ठांच्या व बंदिस्त स्वरुपाच्या दोन्ही परिस्थितीमध्ये आढळतात.
जमिनीखालील पाण्याची पृष्ठभागापासूनची खोली ठिकठिकाणी भिन्न असते. घट्ट व पक्कया बेसॉल्टमधील अपेक्षरित व संधियुक्त भागात ती सामान्यत: 6 ते 12 मी.कुहरी ट्रॅपमध्ये 6 ते 9 मी. आणि असवान निक्षेपात 10 ते 15 मी. इतकी खोल असते. या भागातील योग्य अशा भूभौतिकी परिस्थितीतील प्रत्येक विहीरीतून प्रतिदीन 200 किलो लीटर पाणी मिळू शकते.
- भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेले महत्वपुर्ण प्रकल्प :
शिवकालीन पाणी साठवण योजना :- या योजने अंतर्गत स्त्रोत बळकटीकरणाचे कामे गावांच्या मागणीनूसार करण्यात आलेली आहे. या योजनेमार्फत, छत पाणी संकलन, गावातील पाण्याची टाकी, सिमेंट प्लग, बी.बी.टी., जलभंजन या उपाययोजना करण्यात आलेल्या आहे. वर्धा जिल्हयात 104 गावांमध्ये 1201 उपाययोजना राबविण्यात आल्या आहे. त्याकरीता रु.539.07 लक्ष निधी या कार्यालयांस प्राप्त झाले असून रु.538.30 लक्ष निधी खर्च करण्यात आलेला आहे.
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम (शाश्वतता) :-
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम या योजनेकरीता केंद्र शासनामार्फत निधी प्राप्त झालेला आहे. या कार्यक्रमाचे उद्दीष्ट पारंपारीक व अपारंपारीक रित्या पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकटीकरण करणे आहे. वर्धा जिल्हयात 2011 ते 2019 मध्ये एकुण 103 गावांत 445 उपाययोजना राबविण्यात आल्या. त्याकरीता रु.580.35 लक्ष निधी या कार्यालयांस प्राप्त झाले असून रु.580.35 लक्ष निधी खर्च करण्यात आलेला आहे. या योजनेमार्फत सिमेंट नाला बांध, भूमिगत बंधारा, रिचार्ज ट्रेंच व रिचार्ज शाफ्टची कामे करण्यात आली आहे.
जलयुक्त शिवार अभियान कार्यक्रम :- शासन निर्णय क्र.जलअ-2014/प्र.क्र..203/जल-7 दिनांक 05/12/2014 अन्वये राज्यामध्ये अंमलबजावणी करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे उद्दीष्ट गावाच्या शिवाराच्या पाणी पातळीमध्ये वाढ करणे आहे. सन 2015-16 ते 2017-18 मध्ये 47 गावांत 214 उपाययोजना राबविण्यात आलेल्या आहे. या योजने अंतर्गत एकुण 593.07 लक्ष इतके अनुदान प्राप्त झाले असून रु.515.6 लक्ष खर्च झाला आहे. या योजनेमार्फत सिमेंट नाला बांध, भूमिगत बंधारा, रिचार्ज ट्रेंच व रिचार्ज शाफ्टची कामे करण्यात आली आहे.
जल जीवन मिशन (स्त्रोत बळकटीकरण):- शासन निर्णय क्र.जजमि 2019प्र.क्र.138/पापु-10(07) दिनांक 04/09/2020 अन्वये राज्यामध्ये अंमलबजावणी करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे उद्दीष्ट ‘हर घर जल’ नुसार प्रत्येक घरी 55 ली.प्रतीमाणसी प्रतीदीन पाण्याचा पुरवठा होणे असे आहे. वर्धा जिल्हा मध्ये जल जीवन मिशन योजना सन 2022-23 व 2023-24 मध्ये एकुण 102 गावांत 1564 उपाययोजना राबविण्यात आलेल्या आहे. या योजने अंतर्गत रु.537.67 लक्ष खर्च झाला आहे. या योजनेमार्फत रिचार्ज ट्रेंच व रिचार्ज शाफ्टची कामे करण्यात आली आहे.
जलयुक्त शिवार अभियान 2.0 :- शासन निर्णय क्र.जशिअ-2022/प्र.क्र./302/जल-7 दिनांक 03/01/2023 अन्वये राज्यामध्ये अंमलबजावणी करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे उद्दीष्ट गावाच्या शिवाराच्या पाणी पातळीमध्ये वाढ करणे आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा मार्फत रिचार्ज शाफ्ट व रिचार्ज ट्रेंच या भूजल पुनर्भरणाच्या उपाययोजना घेण्यात येत आहे. वर्धा जिल्हयामध्ये 35 गावांत 646 उपाययोजनां करीता रु.76.21 लक्ष निधी खर्च होणे अपेक्षित आहे.